सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २००२ पासून अध्यात्माचा प्रचार करण्यापेक्षा हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास प्राधान्य देण्याचे कारण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

माझी साधनेची वाटचाल चालू असतांना आध्यात्मिक प्रगती चांगली होत असल्याबद्दल अनेक संतांनी माझे कौतुक केले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, आता स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीला महत्त्व देण्यापेक्षा हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले पाहिजे; कारण हिंदूंची आणि भारताची स्थिती अतिशय केविलवाणी झाली आहे. त्यासाठी मी अध्यात्माचा प्रचार करण्यापेक्षा हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास वर्ष २००२ पासून आरंभ केला. या अंतर्गत संतांचे संघटन करणे, राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणे, राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे ग्रंथ संकलित करणे इत्यादी कार्य करत आहे. मी आतापर्यंत त्यालाच समष्टी साधना या दृष्टीकोनातून प्राधान्य दिले आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर मी पुन्हा साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीला महत्त्व देईन.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (९.२.२०२३)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वरील विचारातून साधकांनी लक्षात घ्यावयाची सूत्रे !

पू. संदीप आळशी

१. साधकांनी व्यष्टी साधना करत असतांना स्वतःची आध्यात्मिक उन्नती होत आहे कि नाही ?, या विचारात अडकण्यापेक्षा समष्टी साधनेसाठी मी अधिकाधिक प्रयत्न करत आहे ना ?, हा विचार करायला हवा.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर सनातन संस्थेच्या स्थापनेपासूनच वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती, हा साधकांच्या साधनेचा केंद्रबिंदू आहे, असे सांगत असत. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावर हिंदु राष्ट्राची घडी बसवणे आदी कार्यांकडे लक्ष देण्यापेक्षा ते पुन्हा साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीला महत्त्व देणार आहेत. यावरून त्यांना असलेली साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीची अपार तळमळ लक्षात येते. साधकांनीही समष्टी साधना करत असतांनाच आध्यात्मिक उन्नती लवकर होण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, भावजागृती अशा व्यष्टी साधनेकडेही तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

– (पू.) संदीप आळशी (९.२.२०२३)