साधनेत टिकून रहाणे, ही साधनेतील परीक्षाच आहे !

पू. संदीप आळशी

सध्या प्रापंचिक अडचणींमुळे काही क्रियाशील किंवा पूर्णवेळ साधना करणार्‍या साधकांच्या मनात शिक्षण, नोकरी, संसार आदींसंबंधी तीव्रतेने विचार येत आहेत. काहींना आपल्याकडे पैसे नाहीत, तर भविष्यात आपले कसे होईल ?, या विचाराने असुरक्षितता वाटते. काहींना साधना आणि सेवा करण्याचा कंटाळा येत चालला असून ऐषारामात जीवन जगणे, यासारख्या मायासक्त जीवनाची ओढ लागली आहे. अशी कारणे वेगवेगळी असली, तरी साधना करून ईश्‍वरप्राप्ती करणे, या जीवनध्येयापासून साधक विचलित झाले आहेत, हे कारण सर्वाधिक खरे आहे. सध्या तीव्र आपत्काळ असल्याने अनिष्ट शक्तींचा जोर वाढला असून त्याही साधकांना साधनापथावरून खाली खेचण्याचे काम जोराने करत आहेत. अशा वेळी साधनेत टिकून रहाणे, ही साधनेतील परीक्षाच आहे, असे समजून साधकांनी त्या अडचणींवर मात करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पुढील काही दृष्टीकोन उपयोगी ठरतील.

१. महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आदींच्या स्वरूपातील महाभीषण आपत्काळाला लवकरच आरंभ होणार आहे. त्या काळात पैसा, घर आदी नाही, तर साधनेचे संरक्षक-कवचच उपयोगी पडणार आहे. यासाठी आता साधनेला प्राधान्य द्यायलाच हवे.

२. अनेक जणांना बाहेरचे चटपटीत खाणे-पिणे, उंची वस्त्रे, महागडे भ्रमणभाष आदी हवे असते. आपल्या आवश्यकता अल्प केल्या, तर आहे त्यामध्येही समाधानाने रहाणे, शक्य होते.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकावस्थेत असतांना स्वत:चे सर्वच गुरुचरणी अर्पण केले होते. त्या काळात ते अर्थार्जनासाठी त्यांचे चिकित्सालय चालवत असत आणि त्यातून मिळणार्‍या धनापैकी आवश्यक तेवढे घर चालवण्यासाठी ठेवून उर्वरित धनाचा व्यय अध्यात्मप्रसारासाठी करत असत. एकदा गुरूंनी त्यांची परीक्षा घेतली. चिकित्सालय चालवूनही काहीच अर्थाजन होत नव्हते. असे असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी शिलकी साठ्यात असलेल्या धनातून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालूच ठेवले. यानंतर त्यांना अशा अनुभूती आल्या की, हातात एक पैसा राहिलेला नसतांना अचानक कुठूनतरी पैशांची सोय व्हायची आणि त्या दिवशीचे काम होऊन जायचे ! गुरूंनी त्यांच्यावर कधीही उपासमारीची पाळी येऊ दिली नाही कि अध्यात्मप्रसारकार्यात खंडही पडू दिला नाही ! आज साधकांना विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले गुरु म्हणून लाभलेले असतांना साधकांनी त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली, तर त्यांनाही तशा अनुभूती येणार नाहीत का ?

प.पू. भक्तराज महाराजांनी एका भजनात म्हटले आहे –

ब्रीद तुझे सत्य । जाणे मी त्रिवार ।
भक्तांचा तू भार । वाही सदा ॥

भक्तवत्सल प्रभूच्या भक्तवात्सल्याची अनुभूती येण्यासाठी त्याच्या भक्तवात्सल्यपणावर श्रद्धाच ठेवावी लागते !

४. साधना करतांना साधनेच्या प्रयत्नांचा आढावा उत्तरदायी साधकांना द्यावा लागतो. सेवा करतांना कार्यपद्धती आणि समयमर्यादेचे बंधन पाळावे लागते. हे सर्व करायचा कंटाळा येतो; म्हणून आपण सुखासीन जीवनाचे वेगवेगळे मार्ग शोधायला लागलो, तर स्वत:च स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्यासारखे होईल. याचे कारण म्हणजे, केवळ तात्कालिक सुख देणार्‍या या मायाजाळात आपण अधिकाधिक गुरफटून जाऊन खर्‍या आनंदापासून कायमचे दूर जाऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे महान मोक्षगुरु आपल्या जीवनात येणे, हे आपले जन्मजन्मांचे महत्भाग्य आहे. या सुवर्णसंधीचा आपण लाभ करून घेऊन आपल्या जीवनाचे सार्थक करून न घेतल्यास आपल्यासारखे नतद्रष्टे आपणच ठरू !

साधकांनो, सावध व्हा ! मायेच्या प्रलोभनांना बळी पडू नका आणि साधना सोडू किंवा अल्प होऊ देऊ नका. साधना अन् सेवा करतांना येणार्‍या अडचणींविषयी, तसेच मनात निर्माण झालेल्या व्यावहारिक गोष्टींविषयी उत्तरदायी साधक किंवा मार्गदर्शक संत यांच्याशी बोलून घ्या अन् त्यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा !

–  (पू.) संदीप आळशी (६.३.२०२३)