सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठित केलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’मध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

३० मार्च २०२३ या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्या निमित्ताने…

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची (टीप) प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली. १४ आणि १५ जुलै २०२२ या दिवशी उत्तराषाढा हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्मनक्षत्र असतांना संकल्प, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, पिंडिकास्थापना, ब्रह्मादीमंडल देवतांचे आवाहन अन् पूजन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सप्तर्षींच्या आज्ञेने प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला. प्रभु श्रीरामासाठी हवनही करण्यात आले. १५ जुलै या दिवशी पूर्णाहुतीने या विधींची सांगता करण्यात आली. या वेळी श्रीराम शाळिग्रामाच्या संदर्भात यू.ए.एस्. या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. ते पुढे दिले आहे.

पिंडिकेमध्ये बसवलेला श्रीराम शाळिग्राम

टीप – श्रीराम शाळिग्राम : नेपाळमध्ये हिमालयाच्या उत्तरेकडे अन्नपूर्णा पर्वत शृंखला आहे. या अन्नपूर्णा पर्वत शृंखलेमध्ये दामोदर कुंड नावाचा गोड पाण्याचा तलाव आहे. हा दामोदर कुंड तलावच श्रीराम शाळिग्रामचे उत्पत्तीस्थान आहे. १०.४.२०२२ या श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना श्रीराम शाळिग्राम मिळाला. याविषयी सविस्तर माहिती bit.ly/3niwkmd या मार्गिकेवर उपलब्ध आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

चौथरा आणि पिंडिका यांना रंग देण्यापूर्वी, रंग दिल्यानंतर आणि त्यांचे पूजन केल्यानंतर अशा एकूण ३ टप्प्यांत त्यांची छायाचित्रे काढून त्यांच्या यू.ए.एस्. (युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी, प्रतिष्ठापना केल्यानंतर आणि अभिषेक केल्यानंतर अशा एकूण ३ टप्प्यांत छायाचित्रे काढून त्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. पूजनानंतर चौथरा आणि पिंडिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढणे; श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वीही त्यात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) असणे : चाचणीतील छायाचित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच आढळली नाही. त्यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. रंग दिल्यानंतर आणि पूजनानंतर चौथरा अन् पिंडिका यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. श्रीराम शाळिग्रामामध्ये पूजनापूर्वीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. प्रतिष्ठापना आणि अभिषेक केल्यानंतरही श्रीराम शाळिग्रामामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण जागेअभावी तिची अचूक प्रभावळ मोजता आली नाही. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप – या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिकाधिक २३३७ मीटर एवढीच मोजता आली; कारण मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. चौथरा आणि पिंडिका यांना रंग दिल्यावर, तसेच त्यांचे पूजन केल्यावर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत (चैतन्यात) वाढ होणे : श्रीराम शाळिग्रामाची स्थापना करण्यासाठी सिद्ध केलेला (बनवलेला) चौथरा आणि पिंडिका यांना रंग दिल्यानंतर, तसेच त्यांचे पूजन केल्यावर त्यांच्यातील चैतन्यात वाढ झाली. रंगकाम करणारे साधक आणि पूजन करणारे पुरोहित यांनी या कृती सेवाभावाने अन् भावपूर्ण केल्याचा हा परिणाम आहे.

सौ. मधुरा धनंजय कर्वे

२ आ. श्रीराम शाळिग्रामामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे : श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पावन वास्तव्याने रामनाथी येथील सनातनचा आश्रम हे भूवैकुंठच झाले आहे. या आश्रमाला विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाच्या रूपाने साक्षात् श्री महाविष्णूचे आगमन झाले आहे. शाळिग्राम हे श्री महाविष्णूचे निर्गुण रूप आहे. प्रतिष्ठापना होण्यापूर्वीही श्रीराम शाळिग्रामामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण जागेच्या मर्यादेमुळे २ सहस्र ३३७ मीटरपेक्षा अधिक प्रभावळ असूनही ती अचूक मोजता येणे शक्य झाले नाही. प्रतिष्ठापनेनंतर, तसेच अभिषेकानंतर श्रीराम शाळिग्रामातील चैतन्यात वाढ झाली; पण जागेच्या मर्यादेमुळे २ सहस्र ३३७ मीटरपेक्षा अधिक प्रभावळ असूनही ती अचूक मोजता येणे शक्य झाले नाही. (सर्वसाधारण व्यक्ती किंवा वस्तू यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असेलच असे नाही. सात्त्विक व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील सात्त्विकतेच्या प्रमाणात त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून येते.)

या संशोधनातून सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठापना केलेल्या श्रीराम शाळिग्रामामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे, हे लक्षात येते. तसेच श्रीराम शाळिग्रामाचे आध्यात्मिक महत्त्वही लक्षात येते.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१३.३.२०२२)

ई-मेल : [email protected]