सद़्‍गुरु सत्‍यवान कदम (वय ६० वर्षे) यांची प्रीती आणि अहंशून्‍यता अनुभवणारे श्री. दिनेश शिंदे !

चैत्र शुक्‍ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त श्री. दिनेश शिंदे यांना त्‍यांच्‍यातील जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम

१. सद़्‍गुरु सत्‍यवान कदम कुडाळ येथे ज्‍या बसने जाणार होते, ती रहित होणे आणि एका बसच्‍या तिकिटाचा दर अधिक असल्‍याने त्‍यांनी ‘‘एवढे पैसे खर्च करायला नको, दुसरा पर्याय पाहूया’, असे सांगणे

‘वर्ष २०१९ मध्‍ये सद़्‍गुरु सत्‍यवान कदम कुडाळ सेवाकेंद्रात वास्‍तव्‍याला होते. एका साधकाच्‍या मुलीच्‍या विवाहाच्‍या समारंभाला उपस्‍थित रहाण्‍यासाठी २४.४.२०१९ या दिवशी ते मुंबई येथे आले होते. ते ज्‍या बसने कुडाळ येथे परत जाणार होते, ती बस काही कारणास्‍तव रहित झाली. त्‍यामुळे ‘प्रवासासाठी अन्‍य काही पर्याय उपलब्‍ध होतात का ?’, हे आम्‍ही पहात होतो. त्‍या वेळी रात्रीचे ११ वाजून गेल्‍यामुळे कुडाळला जाणार्‍या सर्व बसेस निघून गेल्‍या होत्‍या. एक बस कुडाळ येथे जाणार होती; परंतु त्‍या बससाठी एका व्‍यक्‍तीच्‍या तिकिटाचा दर २,५०० रुपये होता. आम्‍ही सद़्‍गुरु दादांना याविषयी सांगितल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘एवढे पैसे खर्च करायला नको. गुरुधन धर्मकार्यासाठी वापरता येईल. ‘आणखी काही पर्याय आहे का ?’, ते पाहूया.’’

श्री. दिनेश शिंदे

२. रेल्‍वेचे आरक्षण मिळाले नसतांना सद़्‍गुरु सत्‍यवानदादांनी ‘सत्‍संगाला उपस्‍थित रहाणे आवश्‍यक असल्‍याने रेल्‍वेच्‍या ‘जनरल बोगी’त किंवा मालडब्‍यात बसून प्रवास करूया’, असे सांगणे

त्‍याच क्षणी ‘संतांचा निर्णय कसा योग्‍य असतो !’, याची प्रचीती आम्‍हाला आली. ‘सावंतवाडीपर्यंत जाणारी एक रेल्‍वे रात्री १ वाजता सुटणार होती’, हे समजल्‍यावर आमचे त्‍या रेल्‍वेने जायचे ठरले. आम्‍ही ‘त्‍या रेल्‍वेचे आरक्षण मिळते का ?’, हे पाहिले; परंतु प्रयत्न करूनही आम्‍हाला तिचे आरक्षण मिळाले नाही. तेव्‍हा सद़्‍गुरु दादा म्‍हणाले, ‘‘उद्या प्रसारातील साधकांचा सत्‍संग आहे आणि मला तेथे उपस्‍थित रहाणे आवश्‍यक आहे. त्‍या रेल्‍वेच्‍या ‘जनरल बोगी’त बसूया, नाहीतर मालडब्‍यात बसून जाऊया. आपल्‍यामुळे गुरुकार्य थांबले, असे व्‍हायला नको.’’

३. रेल्‍वेच्‍या इंजिनच्‍या मागील बाजूला जोडलेल्‍या मालडब्‍यात बसून प्रवास करणे

३ अ. मालडब्‍यात टाकलेल्‍या फळ्‍यांवर बसावे लागणे : त्‍यानंतर आम्‍ही त्‍या रेल्‍वेच्‍या इंजिनच्‍या मागील बाजूला जोडलेल्‍या मालडब्‍यात चढलो. तेथील परिस्‍थिती पाहून मला धडकीच भरली. तेथे बसण्‍यासाठी ‘सीट’ नसून खाली पट्ट्यापट्यांच्‍या फळ्‍या होत्‍या. आम्‍हाला त्‍यावर बसून रात्रभर प्रवास करायचा होता. दादांनी मला प्रेमाने सांगितले, ‘‘दिनेश, बस इथे.’ मी त्‍यांच्‍या शेजारी बसलो.

३ आ. इंजिनचा कर्कश आवाज आणि डिझेलचा धूर अन् प्रवाशांचे पाय लागणे, या स्‍थितीत रात्रभर प्रवास करणे; मात्र सद़्‍गुरु सत्‍यवानदादांच्‍या चैतन्‍यामुळे साधकाला त्रास न होणे : आमच्‍या आजूबाजूला बसलेल्‍या प्रवाशांचे पाय रात्रभर आमच्‍या दोघांवर पडत होते आणि त्‍यांना झोप येत असल्‍याने ते आमच्‍या खांद्यावर डोके ठेवत होते. आमचा डबा इंजिनच्‍या मागेच असल्‍यामुळे इंजिनचा कर्कश आवाज आणि डिझेलचा धूर डब्‍यात येत होता. सद़्‍गुरु दादा मला मधे-मधे विचारत होते, ‘‘काही त्रास होत नाही ना ?’’ तेव्‍हा मी त्‍यांना ‘त्रास होत नाही’, असे सांगत होतो. त्‍यांच्‍या चैतन्‍यामुळे मला त्रास जाणवत नव्‍हता. ७ – ८ घंट्यांच्‍या प्रवासात सद़्‍गुरु दादा एकाच जागी बसून होते. त्‍यांना क्षणभरही झोप मिळाली नाही.

४. सद़्‍गुरु सत्‍यवानदादांची अहंशून्‍यता

तेथे असलेल्‍या लोकांना ‘सद़्‍गुरु पदावर विराजमान असलेला एक जीव त्‍यांच्‍या शेजारी बसला आहे’, याची जाणीवच नव्‍हती. याचे कारण म्‍हणजे सद़्‍गुरु दादांची अहंशून्‍य अवस्‍था ! त्‍यांच्‍या या स्‍थितीमुळे ते कोणत्‍याही परिस्‍थितीवर मात करू शकतात, सर्वसामान्‍यांसारखे वागू आणि बोलू शकतात.

५. साधकाने अनुभवलेली सद़्‍गुरु सत्‍यवानदादांची प्रीती

आम्‍ही कुडाळ सेवाकेंद्रात पोचल्‍यानंतर त्‍यांनी मला सांगितले, ‘‘तू आता झोप. आपल्‍याला रात्रभर अवघडलेल्‍या स्‍थितीत प्रवास करावा लागला. तू दमला असशील. तू २ दिवस येथेच राहून विश्रांती घे आणि नंतर प्रवास कर.’’ माझी सर्व व्‍यवस्‍था करून ते सत्‍संगासाठी गेले.

६. सद़्‍गुरु सत्‍यवानदादांमधील गुणांचे घडलेले दर्शन

सद़्‍गुरु दादांचे आचरण पाहून ‘चणे खावे लोखंडाचे । तैं ब्रह्मपदीं नाचे ॥’ म्‍हणजे ‘कठोर परिश्रम घेतल्‍यावरच ब्रह्मपदाची प्राप्‍ती होते’, या उक्‍तीची मला आठवण झाली. सद़्‍गुरु दादांच्‍या कृतीतून ‘संत, गुरु आणि सद़्‍गुरु कार्य कसे करतात ?’, हे लक्षात येते. या एका प्रसंगातून सद़्‍गुरु दादांनी ‘त्‍यांचा गुरुकार्याचा ध्‍यास, ‘गुरुधनाची हानी होऊ नये आणि ते धन धर्मकार्यासाठी आहे’, याची पदोपदी असलेली जाणीव, साधकाच्‍या संदर्भातील संवेदनशीलता अन् प्रेमभाव आणि त्‍यांची अहंशून्‍य अवस्‍था’, असे अध्‍यात्‍मातील अनेक पैलू उलगडून दाखवले आणि शिकवले. त्‍याबद्दल मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो. प.पू. डॉक्‍टरांनी सद़्‍गुरु सत्‍यवानदादांना घडवले. सद़्‍गुरु दादांच्‍या माध्‍यमातून ‘एक आदर्श साधक आणि शिष्‍य कसा असावा ?’, याचा आदर्शच त्‍यांनी आम्‍हा साधकांसाठी घालून दिला, तसेच मुंबई सेवाकेंद्रातील साधकांना सद़्‍गुरु दादांसारखा आध्‍यात्मिक मित्रही दिला. आम्‍हा सर्व साधकांना साधनेत मार्गक्रमण करण्‍यासाठी त्‍यांचा आदर्श समोर दिल्‍याबद्दल आम्‍ही

प.पू. डॉक्‍टरांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. दिनेश शिंदे (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ५५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२३)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक