मायणी (जिल्हा सातारा) येथील ‘रूरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर’च्या बनावट डॉक्टर प्रकरणी १ मासात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विधानसभा लक्षवेधी…

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ‘रूरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटर अँड रुग्णालय मायणी’ येथील संस्थेत बनावट प्रमाणपत्र देण्याचे व्यवहार करून बनावट आधुनिक वैद्य (डॉक्टर) सिद्ध केल्याच्या गंभीर तक्रारींची नोंद राज्य शासनाने घेतली आहे. या प्रकरणातील संबंधित सर्वांची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून १ मासाच्या आत चौकशी करण्यात येईल, तसेच या प्रकरणाचे अन्वेषण दडपण्याचा प्रकार करणारे संबंधित पोलीस उपअधीक्षक आणि अन्वेषण अधिकारी यांची जिल्ह्याबाहेर अकार्यकारी पदावर नियुक्ती करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येईल, तसेच त्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

सदस्य जयकुमार गोरे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले. या प्रकरणाचे योग्य अन्वेषण न करून अन्वेषण अधिकार्‍यांनी सूत्रधारकांना अभय दिलेले असल्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशास मुकावे लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठा असंतोष पसरलेला आहे. असेच जाळे राज्यात अनेक ठिकाणी चालू आहे. त्यामुळे संबंधित पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांना निलंबित करावे, अशी मागणी सदस्य जयकुमार गोरे यांनी सभागृहात वारंवार केली; मात्र फडणवीस यांनी त्यांची मागणी अमान्य करून वरील विधान केले. फडणवीस यांनी घोषित केलेल्या निर्णयाने सदस्य जयकुमार गोरे यांचे समाधान न झाल्याने ते अप्रसन्न झाले.