१. ‘तात्त्विक ग्रंथातील सूत्रांचे आकलन होत नाही; पण संतांचे चरित्र सहज आकलन होते’, असे स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगणे
‘१४.७.२०२१ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये परात्पर गुरु डॉक्टर पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा अशा पोशाखात आसंदीवर बसले होते. तेथे काही साधक ग्रंथवाचन, तर काही साधक लिखाण करत होते. ‘मी विचार करत आहे’, असेे पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला विचारले, ‘तुम्हाला काही शंका आहे का ? तुम्हाला काही विचारायचे आहे का ?’ तेव्हा ‘माझ्या मनातील विचार परात्पर गुरु डॉक्टरांना समजले’, या विचाराने मला आनंद झाला. मी त्यांना विचारले, ‘काही ग्रंथ वाचतांना मला विषयाचे आकलन लवकर होत नाही. त्या ग्रंथातील विषय समजायला मला अवघड जाते, तर काही ग्रंथांचा विषय किंवा त्यात आत्मचरित्राचे लिखाण असेल, तर ते मला समजते. तात्त्विक ग्रंथ वाचतांना मी कोणते प्रयत्न करायला पाहिजेत?’
२. ‘तात्त्विक भाग म्हणजे ज्ञानमार्गाने मिळालेल्या ज्ञानाचे लिखाण असल्यामुळे ते बुद्धीने समजून घ्यावे लागणे, आत्मचरित्र हे स्वानुभवावर असल्यामुळे समजायला सोपे जाणे’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात उत्तर देणे
परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘प्रत्येकाची प्रकृती निराळी असते. तात्त्विक ग्रंथातील लिखाण ज्ञानमार्गानुसार मिळालेले असते. हा विषय बुद्धीने समजून घ्यावा लागतो. याउलट आत्मचरित्र किंवा संतांचे चरित्र स्वानुभवातून लिहिलेले असते. त्यातील प्रसंग त्यांनी स्वतः अनुभवलेले असतात. त्यामुळे ते समजायला सोपे जाते; म्हणून तुम्हाला आत्मचरित्राचे आकलन लवकर होते.’
परात्पर गुरु डॉक्टरांच्या या उत्तराने माझे समाधान झाले.
३. स्वप्न काल्पनिक नसून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वप्नात येऊन खरोखरच मार्गदर्शन केले’, असे जाणवून कृतज्ञता वाटणे
सकाळी मी जागी झाल्यावर माझ्या मनात स्वप्नाचा विचार आला. तेव्हा ‘हे स्वप्न आणि स्वप्नातील विचार काल्पनिक नसून गुरुदेवांनी स्वप्नात येऊन मला खरोखरच मार्गदर्शन केले आणि माझ्या शंकांचे निरसन केले’, असे मला जाणवले. ‘स्वप्नातून संत शिकवतात’, असे मी केवळ ऐकले होते; परंतु या प्रसंगात प्रत्यक्ष गुरुदेवांनी मला हे अनुभवायला दिले. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्रीमती माया शिंदे (वय ४८ वर्षे), सातारा (१४.७.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |