राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची स्‍थापना करणारे पहिले सरसंघचालक डॉ. केशवराव हेडगेवार !

२२ मार्च २०२३ या दिवशी रा.स्‍व. संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशवराव हेडगेवार यांची जयंती आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांना विनम्र अभिवादन !

‘गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे संस्‍थापक आणि पहिले सरसंघचालक डॉ. केशवराव हेडगेवार यांची जयंती आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांच्‍या जीवनातील काही प्रसंग देत आहोत. या प्रसंगांतून आपल्‍या सर्वांमध्‍ये देशभक्‍ती आणि राष्‍ट्रभक्‍ती वाढावी, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना !

१. महाराणी व्‍हिक्‍टोरियाच्‍या वाढदिवसाची बर्फी गटारात फेकणारा ११ वर्षांचा केशव !

एकदा शाळेमध्‍ये शिक्षक मुलांना बर्फी वाटत होते. त्‍या बर्फीतील एक तुकडा केशवलाही मिळाला. त्‍या वेळी त्‍याने ‘ही बर्फी कशासाठी वाटली जात आहे ?’, असा प्रश्‍न विचारला. तेव्‍हा त्‍याला सांगण्‍यात आले की, महाराणी व्‍हिक्‍टोरियाचा वाढदिवस आहे. त्‍यामुळे ही बर्फी वाटत आहोत. हे ऐकताच क्षणी ११ वर्षांच्‍या केशवने तो बर्फीचा तुकडा गटारीमध्‍ये टाकून दिला आणि म्‍हणाला, ‘‘महाराणी व्‍हिक्‍टोरिया इंग्रजांची राणी आहे आणि त्‍या इंग्रजांनी आपल्‍याला दास बनवले आहे. दास बनवणार्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी आपण आनंद का साजरा करायचा ? आम्‍ही आनंदोत्‍सव तेव्‍हा साजरा करू, जेव्‍हा आम्‍ही आमच्‍या भारत देशाला स्‍वतंत्र करू.’’

२. सगळ्‍याच वर्गांतील प्रमुख मुलांना घेऊन गुप्‍त बैठक घेणे

नागपूरमध्‍ये ‘नील सिटी’ हायस्‍कूलमध्‍ये केशव शिकत असतांना ‘इंग्रज अधिकारी अत्‍याचार करून आपल्‍याला आपली संस्‍कृती, धर्म आणि मातृभक्‍ती यांपासून या ना त्‍या प्रकारे बाजूला करण्‍याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच काय, तर ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणायलासुद्धा बंदी घातली आहे’, हे त्‍यांना समजले. त्‍या वेळी त्‍याने सगळ्‍याच वर्गातील प्रमुख मुलांना घेऊन एक गुप्‍त बैठक घेतली. त्‍या वेळी केशवने सर्वांना सांगितले, ‘‘आपण आपल्‍या मातृभूमीत रहातो आणि इंग्रज शासन आपल्‍याला ‘वन्‍दे मातरम्’ही म्‍हणू देत नाही.’’ त्‍या वेळी सर्व वर्गांतील प्रमुख मुलांनी ठरवले की, आपल्‍या नेत्‍याचे नाव कुणीही सांगायचे नाही. ही गोष्‍ट गुपितच ठेवायची. ज्‍या वेळी इंग्रजी अधिकारी वर्गाचे निरीक्षण करण्‍यासाठी आले, त्‍या वेळी ते केशवच्‍या वर्गात गेल्‍यावर केशवसमवेत सर्व मुलांनी उभे राहून ‘वन्‍दे मातरम्’ अशी घोषणा द्यायला आरंभ केला. त्‍या वेळी शिक्षक भारतीयच होते; पण इंग्रजांच्‍या दास्‍यतेखाली अडकलेले होते. निरीक्षण करणारे अधिकारी म्‍हणाले, ‘‘हा काय मूर्खपणा आहे, इथे ‘वन्‍दे मातरम्’ कुणी शिकवले त्‍याला शोधा, पकडा.’’ दुसर्‍या वर्गात गेल्‍यावर तेथेसुद्धा मुलांनी उभे राहून ‘वन्‍दे मातरम्’ची घोषणा द्यायला आरंभ केला. प्रत्‍येक वर्गात त्‍यांना हाच उनभव आला. त्‍यांनी सर्वच मुलांना विचारले की, तुम्‍हाला ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणायला कुणी शिकवले ? पण कुणीच सांगेना. त्‍या वेळी इंग्रज अधिकारी म्‍हणाले, ‘‘मुलांना शाळेतून काढून टाका.’’ त्‍या वेळी मुलेच म्‍हणाली, ‘‘तुम्‍ही काय काढता ? आम्‍हीच जातो. ज्‍या शाळेत आम्‍ही आमच्‍या मातृभूमीला वंदन करू शकत नाही, ‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणू शकत नाही, अशा शाळेत आम्‍हाला शिकायचेच नाही.’’

३. केशवपुढे इंग्रज शासनाचे सर्व षड्‍यंत्र निकामी होणे

त्‍या वेळी इंग्रज अधिकार्‍यांना काहीच सुचत नव्‍हते. मग त्‍यांनी मुलांच्‍या आई-वडिलांवर दबाव आणण्‍यास आरंभ केला. मुलांना समजवा, शिकवा, जेणेकरून ते आमची क्षमा मागतील. आई-वडील केशवला म्‍हणाले, ‘‘बेटा, त्‍यांची क्षमा माग.’’ त्‍या वेळी केशव म्‍हणाला, ‘‘आम्‍ही कोणताही अपराध केला नाही, तर क्षमा का मागायची ?’’ कुणीतरी केशवला म्‍हणाले, ‘‘देशसेवेसाठी लोकांची जागृती या वयात करण्‍यापेक्षा आता अभ्‍यास करा.’’ त्‍या वेळी केशव म्‍हणाला, ‘‘वडीलधारे लोक, अधिकारी मला सांगतात की, देशसेवा नंंतर कर. जे काम तुम्‍ही करायला पाहिजे, ते काम तुम्‍ही करत नाही; म्‍हणूनच ते काम आम्‍हा मुलांना करायला लागणार आहे. इंग्रज आपल्‍यावर अत्‍याचार करत आहेत. दास बनवत चालले आहेत. हिंदूंचे अत्‍याचाराने धर्मांतर घडवत आहेत आणि आपण ते चूप बसून सहन करतो आहोत. तुम्‍ही अत्‍याचाराला टक्‍कर देण्‍यासाठी संकल्‍प करा, तर मी शिक्षणाकडे लक्ष देईन. नाहीतर शिक्षणासह देशाच्‍या स्‍वातंत्र्याचेही शिक्षण घेईन आणि दुसर्‍या मुलांनाही त्‍यात सक्रीय करीन.’’ दीड मासानंतर ते हायस्‍कूल परत चालू झाले. इंग्रज शासनाचे १४ वर्षे वय असणार्‍या केशवपुढे सर्व षड्‍यंत्र निकामी झाले.

४. जिल्‍हाधिकार्‍याला मान खाली घालायला लावणारा केशव !

एकदा केशव यवतमाळजवळच त्‍याच्‍या मित्रांसमवेत फिरायला गेला होता. त्‍या वेळी तेथे इंग्रज अधिकार्‍यांचा चांगलाच दबदबा होता. त्‍या वेळी तेथील जिल्‍हाधिकारी (कलेक्‍टर) इतका त्रास द्यायचा की, त्‍याला पहिल्‍यावर नमस्‍कार करायचाच. जर कुणी केला नाही, तर त्‍याला शिक्षा दिली जायची. फिरायला निघालेला केशव आणि त्‍यांच्‍या मित्रांना एकदा जिल्‍हाधिकारी समोरच दिसला. त्‍या वेळी मोठमोठी माणसे त्‍या जिल्‍हाधिकार्‍याला नमस्‍कार करत होती. सर्वांनी केशवलाही सांगितले, ‘‘केशव, जिल्‍हाधिकारी येत आहेत. त्‍यांना नमस्‍कार कर’’; पण १५-१६ वर्षांच्‍या केशवने नमस्‍कार केला नाही. जिल्‍हाधिकार्‍याच्‍या शिपायांनी केशवला पकडले आणि म्‍हटले, ‘‘तू नमस्‍कार का करत नाहीस ? साहेब तुझ्‍यापेक्षा मोठे आहेत.’’ केशव म्‍हणाला, ‘‘मी यांना प्रणाम का करू ? हे कुणी महात्‍मा नाहीत, तर एक शासकीय नोकर आहेत. जर त्‍यांनी चांगले काम केले असते, तर मी त्‍यांना आदराने नमस्‍कार केला असता. अत्‍याचार करून प्रणाम करण्‍याची काही आवश्‍यकता नाही.’’

शिपाई त्‍याला म्‍हणाले, ‘‘सगळे लोक त्‍यांना प्रणाम करतात आणि तू असे म्‍हणतोस ?’’ जिल्‍हाधिकार्‍याकडे बघत केशव म्‍हणाला, ‘‘प्रणाम हा आतून करण्‍याची गोष्‍ट आहे. अत्‍याचार करून प्रणाम करवून घेणे, हे आपल्‍याला शोभत नाही. हृदयात आदर नसतांना खोटे खोटे प्रणाम करणे, हे पाप मानले जाते. मग तुम्‍ही मला अत्‍याचाराने पापात का ढकलत आहात ? नुसत्‍या दिसणार्‍या प्रणामाने तुम्‍हाला काय लाभ होणार ?’’ यामुळे इंग्रज जिल्‍हाधिकार्‍याची मान शरमेने खाली गेली. तो म्‍हणाला, ‘‘याला जाऊ द्या, हा साधारण मुलगा नाही.’’ जिल्‍हाधिकार्‍याला केशवने मान खाली घालायला लावली, ही गोष्‍ट वार्‍यासारखी त्‍या परिसरात पोचली. ‘केशवने कमालच केली’, असे सर्व जण म्‍हणत होते.

हा साहसी, वीर, निर्भीड, धैर्यवान आणि बुद्धीवान मुलगा केशव दुसरा तिसरा कुणी नसून डॉ. केशवराव हेडगेवार होते. त्‍यांनीच पुढे जाऊन राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची स्‍थापना केली.’

(साभार : सामाजिक माध्यम)