नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेत ७१ सहस्र ३१५ अर्ज प्राप्त !

नवी मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ७१ सहस्र ३१५ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त श्रीराम पवार यांनी दिली. २८ फेब्रुवारी ही या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक होती. मार्चअखेर एका वर्षाची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्‍या वर्षाच्या शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

उपायुक्त श्रीराम पवार यांनी सांगितले की,…

१. शिष्यवृत्ती योजनेसाठी वर्ष २०२१-२२ साठी ३४ सहस्र १५०, वर्ष २०२२-२३ साठी ३७ सहस्र १६५ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जात काही त्रुटी असतील, तर त्यात सुधारणा करण्यासाठी पालक किंवा विद्यार्थी यांनी अर्ज भरतांना ज्या भ्रमणभाष क्रमांकाची नोंदणी केली आहे, त्या भ्रमणभाष क्रमांकावर लघुसंदेश करण्यात येत आहे; मात्र पालकांकडून तो पाहिला जात नाही. त्यामुळे काही अर्ज अंतिम पडताळणीसाठी थांबून रहातात.

२. पालकांनी लघुसंदेश पाहून अर्जातील त्रुटीमध्ये सुधारणा करावी. त्यानंतर अर्ज छाननीत पूर्णपणे योग्य असल्याचे पडताळल्यावर त्यांना अंतिम संदेश पाठवण्यात येईल. पालकांनी त्या संदेशाला प्रतिसाद देत त्यांना प्राप्त झालेला ओ.टी.पी. द्यावा, त्यानंतरच अर्जाच्या संमतीची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पालकांनी अर्ज भरतांना नोंदणी केलेल्या भ्रमणभाष क्रमांकावर आलेल्या संदेशाद्वारे प्राप्त सूचनांनुसार कार्यवाही करावी.