जेथे माझा राम, तेथे मी करीन त्याची चरणसेवा ।

‘मार्च ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात होते. त्या वेळी मी सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव यांच्या सेवेत होते. मला नियमित त्यांची चरणसेवा (त्यांचे पाय चेपण्याची सेवा) करायला मिळत होती. नंतर मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात गेले. तेव्हा मला त्या दोघींची (सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांची) आणि त्यांच्या चरणसेवेची पुष्कळ आठवण येत होती.

२७.३.२०२१ या दिवशी होळीनिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याविषयीचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात लक्ष्मण नियमित श्रीरामाची चरणसेवा करत होता; परंतु श्रीराम आणि सीता यांचा विवाह झाल्यावर सीता श्रीरामाची चरणसेवा करत होती. त्यामुळे लक्ष्मणाला श्रीरामाच्या चरणसेवेची संधी मिळत नव्हती. आता लक्ष्मणाला होळीच्या दिवशी पुन्हा श्रीरामाच्या चरणसेवेची संधी मिळते. त्यामुळे हा लेख वाचून गुरुकृपेने मला पुढील कविता सुचली.

कु. प्रणिता भोर
कु. प्रणिता भोर

सद्गुरु अनुताई (टीप १),
श्रीरामस्वरूप परम पूज्य (टीप २) माझे ।
पू. जाधवकाकू (टीप ३),
मातृवत् प्रेम करणार्‍या गुरुमाऊलींचेच रूप ।। १ ।।

हा जीव वेडा, सूक्ष्म नाही स्थुलातच अडकला ।
दास बनूनी श्रीरामाची चरणसेवा करण्या तळमळला ।। २ ।।

मानस चरणसेवेने मनाला तेवढे समजावले ।
पण कसे समजावू या हातांना,
जे चरणस्पर्शासाठी व्याकुळ झाले ।। ३ ।।

लक्ष्मणा मिळाली संधी होळीला, करण्या श्रीरामाची चरणसेवा ।
असे काय करू मी की, मिळेल मलाही हे भाग्य पुन्हा ।। ४ ।।

लक्ष्मणा तुला करते प्रार्थना,
दे अंतरी भाव जो तुझ्या मनी आहे रामाप्रती ।
दे तुझ्यासारखी रामभक्ती मला;
जेथे माझा राम, तेथे मी करीन त्याची चरणसेवा ।। ५ ।।

टीप १ – सद्गुरु अनुताई : सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

टीप २ – परम पूज्य : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

टीप ३ – पू. जाधवकाकू : पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव

– कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक