गोव्यात गेल्या ३ वर्षांत सोने तस्करीच्या घटनांमध्ये वाढ

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

देहली, १७ मार्च (वार्ता.) – गोव्यात सोने तस्करीच्या घटनांमधे वाढ झाली असून गेल्या ३ वर्षांत सोने तस्करीच्या ३६ घटना उघडकीस आल्या आहेत. प्रतिवर्षी अशा घटनांमध्ये वाढच होत असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नाला दिलेल्या उत्तरातून समोर आले आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२० मध्ये गोव्यात सोने तस्करीच्या ७ घटना उघडकीस आल्या. त्यात ७ किलो ७४० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. वर्ष २०२१ मध्ये १३ घटना उघडकीस आल्या, ज्यामध्ये १२ किलो १२० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. वर्ष २०२२ मध्ये १५ घटना घडल्या आणि त्यात ८ किलो ९०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. चालू वर्षी आतापर्यंत एक घटना उघडकीस आली असून त्यात १ किलो ९१० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरातील आकडेवारीनुसार वर्ष २०२० मध्ये सोने तस्करीच्या २ सहस्र ५६७ घटना, वर्ष २०२१ मध्ये २ सहस्र ४४५ घटना आणि वर्ष २०२२ मध्ये ३ सहस्र ९८२ घटना घडल्या. चालू वर्षांत आतापर्यंत सोने तस्करीच्या ८७५ घटना घडल्या आहेत. गोव्यात सोने तस्करीच्या सर्वांत अधिक घटना दाबोळी विमानतळावर घडत असतात. देश-विदेशातून विमानाने गोव्यात येणारे पर्यटक, तसेच स्थानिक नागरिक यांचा अशा घटनांमध्ये सहभाग असतो. अशा घटना रोखण्यासाठी विमानतळावर प्रवेश करण्याआधी प्रवाशांची कडक पडताळणी केली जाते. अबकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून अशी प्रकरणे रोखण्याचा प्रयत्न करत असतात.