मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – वाघ आणि बिबटे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तर जंगलाचे क्षेत्र न्यून होण्याचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. त्यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाचे प्रसंग निर्माण होत आहेत. हा संघर्ष टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्था उभी करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यांत बिबट्यांमुळे सर्वसामान्य जनतेला विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याविषयी आमदार जयंत पाटील यांनी १७ मार्चला विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘‘विभाग, वनपरिक्षेत्र आणि परिमंडळ या स्तरांवर ‘वन्यजीव वाचवा पथका’ची स्थापना करण्यात आली. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रात क्षेत्रीय कर्मचार्‍यांकडून गस्ती पथकाद्वारे नियमित गस्त घालणे, तसेच जनजागृती यांद्वारे प्रबोधन करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.’’ या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिल बाबर, संजय कुटे यांनी सहभाग घेतला होता.