शहराच्या नामकरणाच्या विरोधातील आंदोलने तात्काळ थांबवा !

हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने सोलापूर येथे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

निवेदन देण्यास उपस्थित हिंदु राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते

सोलापूर, १७ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव येथे जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या आंदोलनामुळे देशातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे. हे आंदोलनकर्ते रस्त्यावरच्या लढाईची भाषा बोलत असल्याचे दिसून येते. या समुहांनी त्यांची आंदोलने थांबवली नाहीत, तर समाजामध्ये तेढ निर्माण होऊन छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील शांतता भंग होऊ शकते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नावाच्या विरोधात चालू झालेली आंदोलने तात्काळ थांबवण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हािधकारी कार्यालयात आणि पोलीस प्रशासन यांना देण्यात आले. या वेळी शहर प्रमुख रवि गोणे, शहर संघटक आनंद मुसळे, तसेच बाळासाहेब गायकवाड, विलास पोतू, रोहन सोमा, सगर कोळी, लिंबाजी जाधव, विजय गोणे, विठ्ठल मुनगापाटील, यशराज अडकी आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नावांना केंद्र आणि राज्य शासन यांनी मान्यता दिली आहे. ‘शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे’, असे कोणत्या समुहास वाटत असल्यास, त्यांनी न्यायालयात स्वत:ची बाजू मांडावी.