वर्ष १९९७ ते वर्ष २००२ पर्यंत मी कराड, जिल्हा सातारा येथे कुटुंबासमवेत रहात असतांना आमचा साधनेच्या निमित्ताने कै. विजय कणसेकाका आणि त्यांचे कुटुंब यांच्याशी सतत संपर्क येत होता. कै. विजय कणसेकाका अत्यंत विनम्र, मनमिळाऊ आणि आनंदी व्यक्तीमत्त्व होते. त्यांचा सहवास सर्वांना प्रिय होता. कै. विजय कणसेकाकांचे वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी ११.२.२०२३ या दिवशी पहाटे ५.१५ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही वार्ता ऐकल्यावर माझ्या मनात त्यांच्या संदर्भात जुन्या स्मृती पुन्हा जागृत झाल्या. तेव्हा देवाने मला त्यांचा अकस्मात झालेला मृत्यू आणि मृत्यूत्तर प्रवास यांच्या संदर्भातील पुढील सूत्रे उलगडून सांगितली. खरेतर ईश्वराच्या प्रेरणेमुळेच माझ्याकडून कै. विजय कणसेकाकांच्या संदर्भात लेख लिहिला गेला. कै. विजय कणसेकाका यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी हा लेख त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.
१. कै. विजय कणसे यांच्या मृत्यूच्या समयी असणारी आध्यात्मिक स्थिती आणि मृत्यूत्तर झालेली आध्यात्मिक उन्नती !
१ अ. कै. विजय कणसे यांची मृत्यूसमयी ५९ टक्के आध्यात्मिक पातळी असणे : ११.२.२०२३ या दिवशी पहाटे ४ पासून यमदेवाने कै. कणसेकाकांच्या घरात प्रवेश केला होता. यमदेव कै. कणसेकाकांचे प्राणहरण करण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पहात होता. मृत्यूसमयी कणसेकाका यांची कुंडलिनीशक्ती त्यांच्या अनाहतचक्रापर्यंत पोचली होती. तेव्हा त्यांची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के होती. जेव्हा त्यांची मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली. तेव्हा त्यांच्या अंतर्मनातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असणारा व्यक्त भाव जागृत झाला. त्यामुळे त्यांच्या अनाहतचक्राची शुद्धी वेगाने होऊ लागली. परिणामस्वरूप त्यांच्या मनातील मायेतील नाती आणि जग यांच्याशी संबंधित असणारे असत्चे (मायेचे) विचार गळून पडले.
(कै. कणसे यांचा मृत्यूसमयी ते मायेतील कोणाविषयी न बोलता केवळ सेवा, साधक आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदर्भातच बोलत होते. – श्रीमती कणसे (कै. विजय कणसे यांच्या पत्नी)
अनाहतचक्राच्या शुद्धीमुळे त्यांच्या मनातील ईश्वरप्राप्तीचे विचार वाढू लागले. हाच क्षण साधून यमदेवाने कै. कणसेकाकांवर मृत्यूचा पाश टाकला. तेव्हा त्यांच्या अनाहतचक्राला सूक्ष्मातून जोराने धक्का बसला. त्यामुळे कै. कणसेकाकांना जोराने हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचे प्राण एकदम त्यांच्या शरिराला सोडून बाहेर गेले. (कै. कणसे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता, असे त्यांच्या मृत्यूत्तर शवविच्छेदन अहवालातून (पोस्टमार्टेम रिपोर्टममधून) समजले. – श्रीमती कणसे) या प्रक्रियेत त्यांच्या अनाहतचक्राला मिळालेल्या सूक्ष्म स्तरावरील धक्क्यामुळे त्यांच्या कुंडलिनीशक्तीचा प्रवाह एकदम उर्ध्व दिशेने गेला आणि ती शक्ती त्यांच्या विशुद्ध चक्राच्या ठिकाणी स्थिर झाली अन् त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांची पातळी ६० टक्के इतकी झाली.
१ आ. कै. विजय कणसेकाका यांची मृत्यूनंतर १४ व्या दिवशी आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ होणे : त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतरच्या १४ व्या दिवशी त्यांचे मृत्यूत्तर क्रियाकर्म पूर्ण झाल्यावर कै. कणसेकाकांच्या चित्तातील (अंतर्मनातील) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती असणार्या व्यक्त भावाचे रूपांतर अव्यक्त भावात होऊ लागले. तसेच नश्वर स्थूल देह नष्ट झाल्यामुळे त्यांच्या मनातील पृथ्वीवरील गतजन्मातील मायेतील जीवनाशी निगडित असणार्या उरल्या सुरल्या स्मृती पुसल्या जाऊ लागल्या. त्यामुळे कै. कणसेकाकांची सगुण स्तरावरील साधना संपुष्टात येऊन त्यांची निर्गुण साधना चालू झाली. त्यामुळे मृत्यूनंतर १४ व्या दिवशी त्यांची आणखीन आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली.
२. कै. कणसेकाकांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होण्यामागील साहाय्यभूत असणारी गुणवैशिष्ट्ये
२ अ. पुष्कळ साधकत्व असणे : कै. कणसेकाका हे सनातनचे चांगले साधक आणि ईश्वराचे भक्त असल्यामुळे यमदेवाने त्यांच्यावर कृपा करून त्यांचे मरणांतक प्रारब्ध सुसह्य केले होते. त्यामुळे कै. कणसेकाकांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास न होता आनंदावस्थेत मृत्यू झाला.
कै. कणसेकाकांचा स्थुलातील अहं अत्यल्प होता. त्यामुळे त्यांना कुणीही चूक सांगितली, तर ते ती चूक मनापासून त्वरित स्वीकारत होते. त्यामुळे त्यांच्यातील सूक्ष्म अहं न्यून होण्यास साहाय्य होत होते.
२ आ. मायेत असूनही मायेपासून अलिप्त असणे : कै. कणसेकाकांची गत ७ जन्मांची साधना असल्यामुळे ते गृहस्थाश्रमी जीवन जगत असले, तरी त्यांचा या जन्मात मायेकडे कल न्यून होता. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली होती. त्यामुळे त्यांच्या चित्तावर मायेचा प्रभाव अल्प होऊन ते गृहस्थाश्रमातील सर्व कार्ये कर्तव्यबुद्धीने पूर्णपणे करत असूनही ते मायेत गुंतले नव्हते. त्यांच्यातील या वैराग्यामुळे ते एकप्रकारे मायेत असूनही नसल्याप्रमाणे म्हणजे मायेपासून अलिप्त होते.
२ इ. कै. कणसेकाकांच्या चित्तातील निर्मळतेमुळे सतत उत्साही आणि समाधानी रहात असणे : कै. कणसेकाकांनी मागील ७ जन्मांत भक्तीयोगानुसार प्रांजळपणे, प्रामाणिकपणे आणि मनापासून आध्यात्मिक जीवन व्यतीत केले होते. त्यामुळे त्यांचे आध्यात्मिकदृष्ट्या मानसिक वय १० वर्षांच्या मुलाप्रमाणे झाले होते. त्यामुळे त्यांचे चित्त मानससरोवरातील तीर्थाप्रमाणे अत्यंत निर्मळ झाले होते. त्यामुळे त्यांच्या मनाकडे विश्वमनातून प्रक्षेपित होणारे चैतन्य आकृष्ट होऊन ते चित्तातील निर्मळतेमुळे त्यांच्या चित्तात साठून रहात होते. त्यामुळे कै. कणसेकाका सतत उत्साही आणि समाधानी रहात होते.
२ ई. कै. कणसेकाकांच्या कारणदेहातील ज्ञानामुळे सतत आनंदी रहाणे : कै. कणसेकाकांनी मागील ७ जन्मांत ज्ञानयोगानुसार साधना केल्यामुळे त्यांची बुद्धी सात्त्विक आणि प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना विश्वबुद्धीतून येणारे सात्त्विक विचार सहजरित्या ग्रहण करता येत होते. त्यामुळे त्यांना सतत धर्मप्रसार आणि अध्यात्मप्रसार यांच्या नवनवीन कल्पना सुचायच्या. त्यामुळे त्यांचे आध्यात्मिक जीवन ज्ञानी आणि अनुभवी व्यक्तीप्रमाणे ज्ञानसंपन्न होते. त्यामुळे त्यांच्या कारणदेहाकडे (बुद्धीकडे) ईश्वराकडून प्रक्षेपित होणार्या ज्ञानलहरी आकृष्ट होऊन त्या त्यांच्या कारणदेहात (बुद्धीत) साठून रहात होत्या. त्यामुळे कै. कणसेकाका सतत ज्ञानप्राप्तीमुळे सतत आनंदी रहात होते.
३. विविध योगमार्गांनी साधना केल्यामुळे कै. कणसेकाका या जन्मात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होणे
४. काळानुसार कै. विजय कणसे यांच्या आध्यात्मिक पातळीत झालेली वाढ आणि कुंडलिनी शक्तीचा प्रवास झालेले संबंधित कुंडलिनीचक्र
टीप – वर्ष १९९७ ते वर्ष २०२० या कालावधीत कै. विजय कणसे यांचे प्रारब्धाचे भोग तीव्र असल्यामुळे त्यांची साधना त्यांना प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी आध्यात्मिक शक्ती देण्याकरता व्यय झाली. त्यामुळे या २३ वर्षांत त्यांची आध्यात्मिक पातळी केवळ ५ टक्क्यांनी वाढली. वर्ष २०२० नंतर त्यांचे प्रारब्धभोग अल्प राहिल्यामुळे त्यांचा साधनेचा व्यय टळला. त्यामुळे वर्ष २०२० ते वर्ष २०२३ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी झपाट्याने वाढली.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कै. कणसेकाकांना मृत्यू सुसह्य होणे आणि त्यांनी मृत्यूत्तर आध्यात्मिक उन्नती करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून कायमचे मुक्त होणे आणि महर्लाेकात स्थान प्राप्त करणे
कै. कणसेकाकांच्या ७ जन्मांत विविध योगमार्गांनुसार प्रामुख्याने व्यष्टी साधना झाली होती. या जन्मामध्ये त्यांनी धर्म आणि अध्यात्म यांच्या प्रसाराची समष्टी साधना केली. त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनांमुळे त्यांच्यात विकसित झालेल्या सद्गुणांमुळे त्यांच्यावर विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा झाली होती. कै. कणसेकाका यांच्यातील ‘गुर्वाज्ञेचे पालन तंतोतंत करणे आणि ‘श्रीगुरूंच्या मनातील जाणून साधना करणे’, या गुणांमुळे वर्ष २०२० मध्ये त्यांनी ५५ टक्के पातळी प्राप्त केली होती. त्यांनी एकप्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मन जिंकून त्यांचे शिष्यत्व प्राप्त करून गुरुकृपा संपादन केली होती. त्यामुळे कै. कणसेकाकांचा मृत्यू सुसह्य झाला. कै. कणसेकाकांची भावपूर्ण आणि तळमळ युक्त अंतर्साधना पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचा करुणामय कृपावर्षाव कै. कणसेकाका यांच्यावर केल्यामुळे त्यांची मृत्यूत्तर आध्यात्मिक उन्नती होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून कायमचे मुक्त झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे कै. कणसेकाकांच्या लिंगदेहाने १४ दिवसांच्या अल्प कालावधीत पृथ्वीची कक्षा पार करून आकाशमार्गाने, म्हणजे देवयान मार्गाने सूक्ष्मातून प्रवास करून थेट महर्लाेकात प्रवेश मिळवला आहे. आता ते महर्लाेकात पुढील साधना महर्लाेकवासी सनातनच्या दिवंगत साधकांजच्या सत्संगात राहून आणि जनलोकवासी सनातनच्या दिवंगत साधकांचे मार्गदर्शन प्राप्त करून ते संतपद प्राप्त करणार आहेत. त्यामुळे ते पुढच्या जन्मी जेव्हा पृथ्वीवर मनुष्य देह धारण करतील, तेव्हा ते जन्मत:च संत असणार आहेत.’
कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला कै. कणसेकाकांची विविध गुणवैशिष्ट्ये शिकता आली आणि त्यांच्या जीवनातील विविध घटनांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव उमजला’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांचाही उद्धार अशाच प्रकारे करावा’, अशी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करून त्यांच्या चरणी भावपुष्परूपी लेख समर्पित करते.’
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), (सूक्ष्मातून मिळालेल ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२३)
|