पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून काश्मीरमध्ये पंचतारांकित सुविधा उपभोगणार्‍या भामट्याला अटक

किरण भाई पटेल

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पंतप्रधान कार्यालयाचा अतिरिक्त संचालक असल्याचे सांगून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था, बुलेटप्रूफ गाडी, पंचतारांकित सुविधा मिळवणार्‍या किरण भाई पटेल या भामट्याला जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी अटक केली. पटेल याचा संशय अल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर तो बनावट अधिकारी असल्याचे उघड झाले. त्याला १० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती; मात्र ही माहिती गुप्त ठेवण्यात आली होती.

पटेल याने त्याच्या ट्विटर खात्यावरील माहितीत त्याने पीएच्.डी. केल्याचे लिहिले होते. पटेल याने फेब्रुवारी मासामध्ये काश्मीरचा दौरा केला होता. त्या वेळी त्याने सर्व शासकीय सुविधांचा लाभ घेतला होता. या दौर्‍याचे अनेक व्हिडिओ ट्विटरवर प्रसारित केले होते. गुप्तचरांनी त्याच्याविषयी सतर्क केल्यानंतर पोलिसांनी त्याची माहिती घेणे चालू केले होते.

संपादकीय भूमिका

  • यातून सरकारी यंत्रणा किती आंधळेपणाने काम करते, हे स्पष्ट होते ! अशाने जगात भारतीय यंत्रणा हास्यास्पदच ठरतात !