राष्ट्रीय वन आग प्रतिबंध आणि व्यवस्थापन आराखड्यामध्ये गोव्याच्या समावेशासाठी प्रयत्न करणार ! – वनमंत्री विश्वजित राणे, गोवा

पणजी, १६ मार्च (वार्ता.) – राष्ट्रीय वन आग प्रतिबंध आणि व्यवस्थापन आराखड्यामध्ये गोव्याच्या नावाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.

National Forest Fire Prevention and Management Plan –

ते म्हणाले,

‘‘गोव्याच्या नावाचा समावेश करण्यासंबंधी मी लवकरच देहली येथे केंद्रशासनासमवेत बैठक घेणार आहे. गोव्याचे नाव समाविष्ट झाल्यास आम्हाला आगीच्या घटनेच्या वेळी जिथे अधिक प्रमाणात साधनसामग्री लागेल, त्या वेळी आम्हाला साहाय्य करण्यासाठी आणखी काही यंत्रणांना बोलावता येईल. आम्हाला संरक्षण खात्याने पूर्ण पाठिंबा दिला असून आवश्यकता भासल्यास आम्हाला विमानसेवेविषयी साहाय्य मिळेल. कालपासून वनाला आग लागण्याची कोणतीही घटना घडलेली नाही. ही आमच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. दिरोडे, सुर्ला, म्हादई इत्यादी ठिकाणची आग विझवली गेलेल्या स्थानांवर पुन्हा आग लागू नये, यासाठी लक्ष ठेवण्यात येणार आहे. खोतीगाव आणि नेत्रावळी येथे हवेतील आर्द्रता वाढली आणि काही प्रमाणात पाऊस पडल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी पहार्‍यासाठी ३५० व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्टीय आत्पकालीन व्यवस्थापन खात्याने आग लागलेल्या ठिकाणांची पहाणी करून त्वरित उपाययोजना करावी, असा सल्ला दिला आहे. वनांना आग लागण्याच्या घटनांना प्रतिबंध करून त्यावर नियंत्रण आणण्याविषयी गोवा सरकार वन आग व्यवस्थापन आराखडा सिद्ध करणार आहे.’’