‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी रामनाथी आश्रमात आले होते. तेव्हा सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी घेतलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे मला साधनेचे अनेक बारकावे समजले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. एकटेपणाची भीती जाणे
प्रक्रियेला येण्यापूर्वी मला भीती वाटत होती. ‘मी एकटीच आले आहे, मला कसे जमणार ?’, असे मला वाटत होते; पण रामनाथी आश्रमात आल्यावर माझ्या मनात असे विचार आले नाहीत आणि ‘मी एकटी आहे’, असे मला जाणवले नाही.
२. रामनाथी आश्रमात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘खोलीतील सहसाधिकांकडून शिकता येण्यासाठी प्रसंग घडवला’, असे वाटणे : मी रामनाथी आश्रमात आल्यावर रामनाथी आश्रमात सेवा करणारा माझा मुलगा गिरीश आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी निवासाला होतो. मला आश्रमजीवनाचा काहीच अनुभव नसल्यामुळे तो प्रतिदिन भ्रमणभाष करून मला ‘काही अडचणी आहेत का ?’, असे विचारत असे आणि ‘काही अडचण आल्यास सहसाधिकांना विचारून घे’, असे मला सांगत असे. आरंभीचे ४ दिवस मला जड गेले; पण नंतर मला सवय झाली. निवासाच्या ठिकाणी असणार्या प्रत्येक साधिकेकडून ‘ती साधनेत कशी आली ? गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सर्वांना आपलेसे कसे केले ?’, हे मला शिकायला मिळाले. मी माझ्या मुलाच्या समवेत राहिले असते, तर मला त्या साधिकांकडून शिकायला मिळाले नसते.
२ आ. आढाव्यात शिकायला मिळालेली सूत्रे
२ आ १. ‘आढावा कसा द्यायचा ?’ हे शिकता येणे : अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना मी ‘किती वरवरचा आढावा देते ? योग्य प्रकारे आढावा कसा द्यावा ?’, हे मला आढावासेविका सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून शिकायला मिळाले.
२ आ २. ‘मनाचा अभ्यास करण्यात स्वतः न्यून पडल्याची जाणीव होणे आणि तो कसा करायचा ?’, ते सौ. सुप्रिया माथूर यांच्या आढाव्यात हे शिकता येणे : माझ्यामध्ये उतावळेपणा हा स्वभावदोष आहे. त्यामुळे माझ्याकडून ‘जलद गतीने बोलणे, धावपळ करत कृती करणे’, असे होत होते. आढाव्यामध्ये उतावळेपणाचे सूत्र चालू असतांना सौ. सुप्रियाताई म्हणाल्या, ‘‘जलद गतीने बोलल्यावर ‘इतर साधकांना ते समजले का ?’, हे आपण त्यांना विचारतो का ? साधकांना ते सूत्र योग्य प्रकारे समजले नाही, तर त्यांच्याकडून योग्य कृती होईल का ? मग यातून आपली साधना कशी होईल ? त्याचप्रमाणे जलद गतीने बोलल्यानेे किंवा कृती केल्याने शरीर स्थिर होण्यासाठी १० मिनिटे लागतात, तर मन स्थिर होण्यासाठी किती वेळ लागेल ?’’ मी मनाचा असा अभ्यास कधीच केला नव्हता. गुरुदेवांनी इतकी वर्षे साधकांना प्रक्रिया शिकवली; पण ‘त्याचा लाभ करून घेण्यास मी न्यून पडले’, याची मला जाणीव झाली.
३. वर्तमानकाळात राहिल्याने प्रार्थना आणि कृतज्ञता यांमध्ये वाढ होणे
‘चूक झाल्यावर मनात कोणते विचार आले ? कोणत्या टप्प्यावर अयोग्य कृती किंवा विचार झाले ?’, असा विचार मला करता येऊ लागला. ‘मन भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांच्या विचारात रमले आहे का ? वर्तमानकाळात राहून देवाशी अनुसंधान ठेवून सर्वकाही करायला हवे’, हे लक्षात आले. त्यामुळे माझ्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता वाढल्या.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला आश्रमात येण्याची संधी मिळाली. त्यांनीच माझ्याकडून प्रयत्न करून घेतल्यामुळे मला आश्रमजीवन अनुभवता येऊन त्यातील आनंद घेता आला. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. उज्ज्वला पंडित पाटील, रायगड (१४.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |