‘जंगली रमी’ या ‘ऑनलाईन’ जुगारात महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महाराष्ट्राच्या मंत्रालयासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामावर असतांनाही कर्मचारी हा ऑनलाईन जुगार खेळत असतात. कष्ट न करता अल्पावधीत ‘श्रीमंत’ होण्यासाठी अनेकांनी हा उपाय शोधला आहे. देशभरातील ८ कोटींहून अधिक नागरिक हा खेळ खेळत असल्याचे अनुमान एका संस्थेने वर्तवले आहे.
अनेक सामाजिक माध्यमे आणि प्रसिद्ध कलाकार या खेळाचे विज्ञापन करत असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. वर्ष २०१५ मध्ये न्यायालयाने या खेळाला ‘कौशल्यावर आधारित खेळ’ असा निकष लावला आहे. काही वर्षांपूर्वी कुणी जुगार खेळत असेल, तर त्याला आपण वाईट नजरेतून पहायचो आणि त्यामुळे खेळणार्याला आपण कुठे तरी चुकत आहोत, याची जाणीव व्हायची; पण आता नामवंत कलाकार ‘हा खेळ म्हणजे कामाचा ताण घालवण्याचे साधन आहे; म्हणून आम्ही याचा उपयोग करतो’, असे विज्ञापन करतात. विज्ञापनांमधून मिळणार्या पैशांसाठी आपण तरुण पिढी वाया घालवण्याचे पाप करत आहोत, हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे चिंताजनक आहे.
जुगारामुळे अनेकांची घरे उद़्ध्वस्त झाली आहेत आणि काही होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतांना प्रशासनाला यामधून मिळत असलेल्या ‘करामुळे’ प्रशासनही या खेळाकडे स्वार्थीपणाने दुर्लक्ष करते. दारू, जुगार यांमधून सरकारला सवाधिक कर मिळतो. त्यामुळे सरकार त्यावर बंधने घालत नाही, असे जनतेला वाटते. या मिळणार्या पैशातून सरकार ‘यातूनच आम्ही जनतेची कामे करतो’, असे दाखवत असेल, तर असा विकास कितपत टिकाऊ आणि लाभादायी असेल ? तसेच काही नागरिक या खेळावर बंधने येऊ नयेत; म्हणून आग्रही असतील, तर अशी मंडळी खरोखर राष्ट्राचा विकास साधू शकतील का ? अनेक शेतकरी कुटुंबे दारू आणि जुगार यांमुळे उद़्ध्वस्त झाली आहेत अन् त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहून हे सर्व कसे थांबेल यांसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, तसेच जुगाराविषयी जाहीरपणे समर्थन करणार्या मंडळींवरही कडक वचक बसवणेही तितकेच आवश्यक आहे. हीच सूज्ञ जनतेची अपेक्षा !
– श्री. जयेश बोरसे, पुणे
_________________________________________
हे ही वाचा –
♦ ‘जंगली रमी’ या ऑनलाईन जुगारात महाराष्ट्रासह देशभरात वाढ !
https://sanatanprabhat.org/marathi/659889.html