बामणोली तर्फ कुडाळ येथील सैनिक प्रथमेश पवार यांची जम्‍मूत आत्‍महत्‍या नसून हत्‍याच ! – संजय पवार, प्रथमेश यांचे वडील

आर्मी कॅम्‍पमधील एका संशयिताला अटक

प्रथमेशचे पार्थिव बामणोली तर्फ कुडाळ येथे आणतांना सैनिक

सातारा – बामणोली तर्फ कुडाळ येथील सैनिक प्रथमेश संजय पवार यांनी आत्‍महत्‍या केली नसून त्‍यांची हत्‍याच झाली होती. या प्रकरणी जम्‍मू पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे, अशी माहिती सैनिक प्रथमेश पवार यांचे वडील संजय पवार यांनी दिली.

संजय पवार पुढे म्‍हणाले की, प्रथमेश पवार हे जम्‍मू-काश्‍मीर येथे कर्तव्‍यावर होते. २० मे २०२२ या दिवशी त्‍यांनी आत्‍महत्‍या केल्‍याचे घोषित करण्‍यात आले; मात्र ज्‍या दिवशी प्रथमेशने आत्‍महत्‍या केली. त्‍या आधी रात्री ९.३० ते ९.४५ तो माझ्‍याशी बोलला. नंतर लगेच रात्री १०.२० मिनिटांनी कॅम्‍पमधील मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी कळवले की, प्रथमेश यांना गोळ्‍या लागल्‍या आहेत. त्‍यामुळे आम्‍हाला संशय आला. २३ मे या दिवशी प्रथमेशचे पार्थिव बामणोली तर्फ कुडाळ येथे आणण्‍यात आले. तेव्‍हा आम्‍हाला सैन्‍य अधिकार्‍यांनी प्रथमेशचे व्‍यवस्‍थित अंत्‍यदर्शनही घेऊ दिले नाही. त्‍यामुळे आमच्‍या संशयाला पुष्‍टी मिळाली. नंतर दीड मासाने मी सैन्‍य अधिकार्‍यांना ही आत्‍महत्‍या नसून हत्‍या असल्‍याचे सांगितले; मात्र त्‍यांनी हा विषय जम्‍मू पोलिसांशी निगडीत असल्‍याचे सांगितले. पुढे मी जम्‍मू पोलिसांशी संपर्क करून त्‍यांना याविषयी माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ३ पत्रे लिहिली. तरीही काही झाले नाही. पुढे मी याविषयी राष्‍ट्रपतींशी पत्रव्‍यवहार करणार असल्‍याचे सैन्‍य अधिकार्‍यांना सांगितले. (सैनिकाच्‍या वडिलांना मुलाच्‍या दुर्घटनेविषयी योग्‍य माहिती का दिली जात नाही ? त्‍यांनाच संपर्क करण्‍यास सांगणे ही असंवेदनशीलता आहे. सैन्‍य प्रशासनाने संबंधित सैनिकाच्‍या कुटुंबाला न्‍याय मिळवून देणे आवश्‍यक ! – संपादक) जम्‍मू पोलिसांनी आर्मी कॅम्‍पमधील वैद्य खुर्शर यांना अटक केली. त्‍यामुळे प्रथमेश याची आत्‍महत्‍या नसून हत्‍याच झाली आहे, हे सिद्ध झाले. प्रथमेशची हत्‍या करणार्‍याला फाशीची शिक्षा देण्‍यात यावी, अशी मागणी मी सैन्‍य अधिकार्‍यांकडे केली आहे.