गोवा : मेरशी येथील ‘जंक्शन’वर कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ‘सिग्नल’ यंत्रणेचे उद्घाटन

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सिग्नल यंत्रणेचे १५ मार्चला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

पणजी – येथील मेरशी जंक्शनवर कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सिग्नल यंत्रणेचे १५ मार्चला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीचे व्यवस्थापन आणि चलन देणे या गोष्टींचा या यंत्रणेत समावेश आहे. या वेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘नवीन यंत्रणेमुळे अपघातांवर नियंत्रण मिळवण्यास साहाय्य होईल. या यंत्रणेत वाहतुकीचे नियंत्रण करण्यासह वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहनचालकांची कॅमेर्‍याद्वारे नोंद होईल. या यंत्रणेद्वारे दिनांक, वेळ आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकाचे छायाचित्र यांसह वाहनचालकाच्या घरी चलन पाठवण्यात येईल. तसेच या यंत्रणेमुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास साहाय्य होईल. स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत अजून १६ जागी अशा प्रकारची यंत्रणा बसवली जाईल.’’

हा प्रकल्प कर्नाटकतील बेलटेक एल्. या आस्थापनाने घेतला असून सार्वजनिक आणि खासगी भागीदारी तत्त्वावर चालवण्यात येणार आहे. चलन दिल्यानंतर येणार्‍या महसुलाची रक्कम यंत्रणा प्रस्थापित करणारे आस्थापन आणि सरकार यांना अनुक्रमे ७०ः३० या प्रमाणात मिळेल. ही यंत्रणा बसवण्यात सरकारला कोणताही खर्च येणार नाही. आस्थापनाने ही यंत्रणा बसवण्यासाठी ४० लाख रुपये खर्च केले आहेत.