‘२ मार्च २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण त्रिदोष (वात, कफ आणि पित्त), त्यांचे गुण आणि कार्य समजून घेतले. तसेच ते कशामुळे वाढतात ? आणि कोणती लक्षणे निर्माण करतात, ? हेही पाहिले. या लेखात वाढलेल्या दोषांवर आयुर्वेदाची कोणती चिकित्सा करायला हवी ? आणि कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा ? ते येथे देत आहोत.
१. पदार्थांची चव आणि त्रिदोष यांचा संबंध
आपल्या चुकीच्या आहार विहारामुळे आपले दोष वाढत असतात. त्याचा काही जणांवर लगेच परिणाम दिसून येतो. अधिक प्रमाणात तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले की, वात वाढतो. तेलकट पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले की, पित्त होते. तसेच गोड, आंबट आणि खारट पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले की, कफ वाढतो. हे परिणाम काही जणांमध्ये काही दिवसांत, तर काही जणांमध्ये काही मासांमध्ये दिसत असतात. त्याची तीव्रता ही प्रत्येकाच्या प्रकृतीवर अवलंबून असते. त्यामुळे पदार्थांची चव आणि त्रिदोष यांचा नेमका काय संबंध आहे, हे समजून घ्यावे लागेल. आयुर्वेदात चवीला ‘रस’ असे म्हटले आहे. हे रस ६ प्रकारचे असतात.
अ. मधुर
आ. अम्ल (आंबट)
इ. लवण (खारट)
ई. कटू (तिखट)
उ. तिक्त (कडू )
ऊ. कशाय (तुरट)
याहून वेगळ्या चवी अस्तित्वात नाहीत.
२. पंचमहाभूते आणि त्रिदोष यांचा संबंध
आपण म्हणतो की, या सृष्टीतील प्रत्येक वस्तू ही पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनली आहे. त्यामुळे वातामध्ये असणारे महाभूत ज्या चवीमध्ये असेल. त्या चवीचे पदार्थ खाल्ले की, वात वाढतो. आता कोणती चव कोणता दोष वाढवतात आणि अल्प करतात, ते पाहूया.
अ. गोड, आंबट आणि खारट : या चवीचे पदार्थ वात अल्प करतात; पण कफ वाढवतात.
आ. तिखट, कडू आणि तुरट : या चवीचे पदार्थ वात वाढवतात; पण कफ अल्प करतात.
इ. तुरट, कडू आणि गोड : या चवीचे पदार्थ पित्त अल्प करतात, तर आंबट, खारट आणि तिखट चवीचे पदार्थ पित्त वाढवतात.
पित्त वाढल्यावर आपण वैद्यांकडे गेलो, तर ते आधी आपल्याला ‘काल काय खाल्ले ?’, असे विचारतात. त्यारून ते कोणत्या गुणधर्माचे पदार्थ तुमच्या खाण्यात आले ? आणि कोणता दोष वाढला? हे तपासतात. त्यामुळे आपण वैद्यांच्याच सल्ल्याने औषध घेतले पाहिजे; कारण त्यांना आपले दोष, प्रकृती आणि इतर शारीरिक कारणे यांचा संपूर्ण अभ्यास असतो.
३. वातावर आयुर्वेदाची चिकित्सा
वातावर आयुर्वेदिक चिकित्सा सांगतांना महर्षि वाग्भट यांनी पुढील गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत.
अ. स्नेहन : म्हणजे आपल्या शरिरामध्ये स्निग्धता निर्माण करणे. वात रुक्ष असल्यामुळे त्याच्या विरुद्ध गुणाची चिकित्सा करायची, तर शरिरात स्निग्धता निर्माण व्हायला हवी. त्यासाठी आपल्याला पोटातून तेल-तूप अशा पदार्थांचा किंवा आवश्यकतेनुसार औषधी सिद्ध तेल-तूप यांचा वापर करावा लागतो.
आ. स्वेदन : घाम आणणे, शेकणे, वाफ घेणे
इ. हलके रेचन : एखाद्याला मलबद्धता असल्यास त्याला पोट साफ होण्याचे सौम्य औषध देणे.
ई. अभ्यंग : मालिश करणे, अंगाला तेल लावून ते जिरवणे.
उ. बस्ती : स्निग्ध आणि उष्ण तेलाची बस्ती
ऊ. आहारात गोड, आंबट आणि खारट चवीचे पदार्थ घेणे, तसेच गरम गरम ताजे अन्न सेवन करणे.
उदा. गहू,ज्वारी, जव, पडवळ, तुपात किंवा तेलात परतलेला मुळा, डाळ (तूर, मूग, मसूर, उडीद, तीळ, तांदूळ, कुळीथ, पडवळ, कोहळा, लाल भोपळा, हिंग, सुंठ, आले इत्यादी. फळांमध्ये – द्राक्ष, केळी, सफरचंद, आंबा, संत्री, मोसंबी इत्यादी) येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, गोड, आंबट आणि खारट चवीच्या पदार्थांनी वात अल्प होतो. त्यामुळे आपण केवळ हेच पदार्थ खाल्ल्यास वात अल्प होईल, असा अर्थ घेऊ नये. आहारात सगळ्याच चवीचे पदार्थ घेतले पाहिजे; या ३ चवींचे पदार्थ अन्य चवींहून थोडे अधिक घ्यायचे. हे पदार्थ औषधाला पर्याय म्हणून न घेता पथ्य म्हणून घ्यायचे आहेत.
४. पित्तावर आयुर्वेदाची चिकित्सा
अ. घृतपान : घृतपान, म्हणजे तूप पिणे. रुग्णाने किती तूप प्यायचे, हे रुग्णाची प्रकृती आणि त्याची अन्न पचवण्याची क्षमता यांवरून वैद्य ठरवत असतात.
आ. मधुर आणि शीत अशा गुणधर्माच्या औषधांनी पोट साफ करणे. आता याच गुणधर्मांच्या औषधाने पोट साफ करायचे, म्हणजे शरिरातून पित्त अल्प करत असतांना वात वाढणार नाही, याचीही काळजी घ्यायची आहे.
इ. चंदन किंवा वाळ्याचा लेप करणे : पित्त वाढल्यावर शरिरात दाह हे लक्षण निर्माण होते. ते अल्प करण्यासाठी अशा स्वरूपाचे उपचार सांगितले आहेत.
ई. दूध आणि तूप यांसारखे सौम्य पदार्थांचे सेवन करणे
उ. पित्तावर विरेचन हा पंचकर्मातील एक उपचार करतात. शुद्धीपूर्वी शरिराची सिद्धता केल्यानंतर पोट साफ करवून घेतले जाते. त्याला ‘विरेचन’ म्हणतात.
आहारात गोड, कडू आणि तुरट चवीचे पदार्थ घ्यावेत. उदा. गहू, तांदूळ, तूर, मूग, मसूर या डाळी. कोहळा, पडवळ, तंदुळजा, दुधी, काकडी भोपळा, कोथिंबीर या भाज्या, तसेच गोड द्राक्ष, केळी, डाळिंब हे पित्त अल्प करणारी फळे आहेत.
५. कफावर आयुर्वेदाची चिकित्सा
अ. कफावर तीक्ष्ण वमन आणि विरेचन हे पंचकर्मातील उपचार केले जातात. वमन म्हणजे औषधे घेऊन रुग्णाकडून उलट्या करवणे आणि विरेचन म्हणजे औषधांनी जुलाब करवणे होय.
आ. कफ विकार असणार्या व्यक्तींनी नियमित व्यायाम करावा. येथे क्षमतेहून थोडा अधिक व्यायाम अपेक्षित आहे.
इ. कफ वाढलेल्या व्यक्तींनी नेहमी क्रियाशील रहाण्याचा प्रयत्न करावा.
ई. उपवास करावा.
उ. आहारामध्ये तिखट, कडू आणि तुरट चवीचे पदार्थ असावेत. उदा. तांदूळ, कुळीथ, कारले, सुरण, वांगी, आले, लसूण, हिंग असे पदार्थ आहारात असावेत.
६. आहाराविषयी भारतियांकडून होणार्या चुका
अ. आपल्या देशात वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीर, लोणचे, पापड किंवा कुरडई, एखादा गोड पदार्थ आणि भातावर चमचाभर तूप असा परिपूर्ण आहार घेण्याची पद्धत किती आदर्श आहे, हे लक्षात येते. अर्थात् या हे पदार्थ योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. असे असले, तरी एवढा परिपूर्ण स्वयंपाक करायला सध्या कुणालाही वेळ नसतो; पण हेच जेवण आपण मोठ्या हॉटेलमध्ये थाळीची भली मोठी किंमत देऊन ग्रहण करतो. जी गोष्ट सर्वाधिक वेळ देऊन करण्यासारखी आहे आणि ज्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, अशा स्वयंपाकाकडे आपण दुर्लक्ष करतो. भारतीय परंपरेतील पाककला इतक्या निरनिराळ्या पदार्थांनी समृद्ध असतांना आपण ‘ओट्स’, ब्रोकोली, ऑलिव्ह तेेल, अशा पदार्थांच्या नावांना भुलतो. आपल्याला केवळ तारतम्य आणि प्रमाण यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
आ. आपण दुसरी चूक करतो. ती म्हणजे आवडीचा पदार्थ पुष्कळ आवडतो; म्हणून आपण अगदी यथेच्छ खातो. आपली पचनक्षमता किती आहे, हे आपण बघत नाही.’
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे
(साभार : ‘पंचम वेद-आयुर्वेद’, यू ट्यूब वाहिनी)