पुणे – रायगडावरील नगारखाना आणि राजवाड्याचे मनोरे वा स्तंभ पुन्हा आहे तसे उभे रहावेत, ही प्रत्येक दुर्गप्रेमीची अपेक्षा आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने त्यासाठीचा पाठपुरावा चालू झाला आहे. या दोन्ही वास्तूंचे जतन-संवर्धन होणे आवश्यक असून योग्य वेळी हे काम झाल्यास रायगडप्रेमींसाठी ती आनंदाची बातमी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर देहलीमध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची बैठक होत असून (ए.एस्.आय.) या वास्तू पुन्हा उभ्या करण्यासाठी ते काय पावले उचलणार आहेत, याकडे शिवप्रेमींचे लक्ष आहे.
प्राधिकरणाचे मुख्य ‘आर्किटेक्ट’ वरुण भामरे यांनी सांगितले की, रायगडावरील नगारखाना ही आज सर्वाधिक सुस्थितीत असणारी वास्तू आहे; मात्र त्यावर छत नसल्याने पावसाळ्यात पाणी साठून त्यात ते मुरते, तसेच मनोर्यांच्या शिल्लक असलेल्या नक्षीची झीज होत असून त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे या वास्तूंची तातडीने देखभाल दुरुस्ती आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाने चेन्नई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’कडून (आयआयटी) या वास्तूंचा अहवाल करून घेतला आहे. ‘हा अहवालही शिवप्रेमींसाठी खुला करावा, तसेच उत्खननाला पुरातत्व विभागाने अनुमती द्यावी’, अशी मागणी रायगड विकास प्राधिकरणाने केली आहे.
इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, वास्तूशास्त्रीय पुराव्यांचा आधार घेऊन या वास्तू पुन्हा उभ्या करणे शक्य आहे. अशा वास्तू पुरातत्व विभागाने किंवा जगभरातील ‘मॉन्युमेंट्स’मध्ये पुन्हा उभ्या राहिल्याचे दिसते. पुरातत्व विभागाच्या नियमात राहूनही त्यांना मूळ वैभव प्राप्त करून देणे शक्य आहे. नगारखान्यावर छत टाकल्यास या वास्तूचे शिवकालीन वैभव समोर येईल.