नावातच सर्वकाही असून ‘इंडिया’चे नामकरण ‘भारत’ करा !

४ जुलै १७७६ या दिवशी अमेरिकेने ब्रिटिशांकडून स्‍वातंत्र्य मिळवले, तेव्‍हा सर्वप्रथम त्‍यांनी त्‍यांच्‍यावर आक्रमण करणार्‍या ब्रिटिशांची संस्‍कृती, नियम, पायाभूत सुविधा आणि इंग्रजी भाषा नष्‍ट केली. अमेरिकेने आक्रमणाचे सर्व पुरावे नष्‍ट केले. त्‍यामुळे आधुनिक काळातील अमेरिकन तरुण मुलांना ‘आपल्‍या देशाला कुणापासून स्‍वातंत्र्य मिळाले आहे ?’, हे ठाऊकही नाही. मानहानीकारक वागण्‍यामुळे जे पती-पत्नी विभक्‍त होतात, ते एकमेकांचे वाढदिवस साजरे करत नाहीत, तसेच ती महिला पतीचे नाव न लावता माहेरचे आडनाव लावते. ती महिला पोटगी वगळता पूर्वीच्‍या नातेसंबंधाच्‍या सर्व खुणा नष्‍ट करते; कारण त्‍या खुणांमुळे तिच्‍या भावना दुखावल्‍या जातात. हे इतके साधे सरळ आहे. तेच सध्‍या भारतात होत आहे. परकीय संस्‍कृतीशी ओळख दाखवणारी शहरांची नावे नष्‍ट करून भारताची संस्‍कृती जपण्‍यासाठी पूर्वीची नावे ठेवली जात आहेत.

१. पूर्व आणि पश्‍चिम जर्मनीचे पुनःएकत्रीकरणाच्‍या वेळी करण्‍यात आलेले नामांतर  

दुसर्‍या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीत साम्‍यवादी सत्तेत आले. त्‍या वेळी त्‍यांनी सर्वप्रथम देशातील रस्‍ते आणि शहरे यांची नावे पालटली. ‘केम्‍निट्‍स’ या शहराचे नाव ‘कार्ल-मार्क्‍स स्‍टाट्’ करण्‍यात आले. ‘लाइपसिग विद्यापिठा’चे नाव पालटून ‘कार्ल-मार्क्‍स विद्यापीठ’ करण्‍यात आले. पूर्व जर्मनीतील सर्व मार्गांना लेनिन, स्‍टॅलिन, अर्न्‍स्‍ट टॅलमन, मार्क्‍स, एंजल्‍स, रोझा लक्‍सनबर्ग आणि अन्‍य मार्क्‍सवादी यांची नावे देण्‍यात आली. देशात सर्वत्र लोकप्रिय साम्‍यवादी नेत्‍यांचे पुतळे उभे करण्‍यात आले.

जेव्‍हा १९९० मध्‍ये पूर्व आणि पश्‍चिम जर्मनीचे पुनःएकत्रीकरण झाले, तेव्‍हा तत्‍कालीन जर्मनी शासनाने साम्‍यवादी सत्तेच्‍या काळात ठेवलेली नावे पालटली. पूर्व जर्मनीतील लेनिन आणि स्‍टॅलिन यांचे पुतळे नष्‍ट करण्‍यात आले, तसेच रस्‍ते अन् महामार्ग यांची नावे पालटण्‍यात आली. संपूर्ण जगात अशी असंख्‍य उदाहरणे पहायला मिळतात.

२. …तर मुलांची नावे राक्षसांवरून का ठेवत नाही ?

जर नावात काही नाही, तर आक्रमणकर्त्‍यांनी प्रयागराजचे नामांतर अलाहाबाद, कर्णावतीचे अहमदाबाद, ईश्‍वरपूरचे इस्‍लामपूर आणि हनुमानपूरचे हुमायूपूर का केले ? तुम्‍ही कितीही स्‍वतंत्र विचारांचे असला, तरी तुम्‍ही तुमच्‍या मुलाचे नाव कंस अथवा दुर्योधन आणि मुलीचे नाव शूर्पणखा अथवा पूतना ठेवत नाही ? आई-वडील मुलीचे नाव ‘दिती’ न ठेवता ‘अदिती’ का ठेवतात ? तसेच मुलाचे नाव ‘शकुनी’ न ठेवता ‘अर्जुन’ का ठेवतात ? प्राचीन ग्रंथांतील ही नावे विसरून जाऊया. कुणी आपल्‍या मुलाचे नाव ‘पराजय’ ठेवते का ? नाही, तर सामान्‍यतः ‘विजय’ असे नाव ठेवले जाते. लोक मुलाचे नाव ‘दानव’ ठेवत नाहीत, तर ‘देव’ असे नाव ठेवतात.

३. हिंदु संस्‍कृती, परंपरा, श्रद्धा आणि पूर्वज यांच्‍याविषयी अभिमान बाळगायला हवा !

नाव पालटण्‍यावरून चाललेल्‍या या वादात ‘आम्‍हाला काहीच वाटत नाही’, असे दाखवून शांत रहाण्‍याच्‍या नावाखाली मूर्खासारखे वागणे थांबवायला हवे. आपल्‍या पूर्वजांनी मुसलमान, पोर्तुगीज आणि ब्रिटीश यांची आक्रमणे अन् अत्‍याचार सहन करून अत्‍यंत प्रतिकूल स्‍थितीत हिंदु संस्‍कृती, परंपरा, श्रद्धा पुढच्‍या पिढीपर्यंत पोचवली आहे. अशा पूर्वजांविषयी आपल्‍याला अभिमान आणि आदर वाटला पाहिजे. स्‍वतःचे अस्‍तित्‍व, ओळख आणि भूतकाळ यांच्‍याविषयी अभिमान बाळगायला हवा.

४. नावे पालटण्‍याच्‍या प्रक्रियेचे विडंबन करणे म्‍हणजे स्‍वत्‍वाच्‍या संकल्‍पनेत गोंधळ !

आपल्‍या शहरांची नावे प्रयागराज, कर्णावती, ईश्‍वरपूर, हनुमानपूर, लक्ष्मणनगर अशी होती. ज्‍या क्रूर आक्रमणकर्त्‍यांनी या खुणा स्‍थापित केल्‍या, त्‍यांनी आमच्‍या पूर्वजांना मारले, त्‍यांची हत्‍या केली, महिलांवर बलात्‍कार आणि अत्‍याचार केले. थोडा अभिमान आणि स्‍वाभिमान बाळगा. आपल्‍या पूर्वजांविषयी थोडा तरी विचार करा की, जेव्‍हा ‘रानटी आक्रमणकर्ते’ आपल्‍या पूर्वजांचा शिरच्‍छेद करण्‍याचा, त्‍यांचे धर्मांतर करण्‍याचा आणि महिलांवर बलात्‍कार करण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होते, तेव्‍हा पूर्वजांनी किती शौर्य दाखवले आहे. त्‍यांनी आपल्‍या स्‍वाभिमानाशी, त्‍यांच्‍या आदर्शांशी कधीही तडजोड केली नाही. त्‍यांनी आपली ओळख कधीच सोडली नाही. त्‍यांनी कधीही आपला धर्म सोडला नाही. परकियांच्‍या आक्रमणांची प्रतीके आणि खुणा नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांचे विडंबन, उपहास आणि चेष्‍टा केल्‍यास आपल्‍या स्‍वत्‍वाच्‍या संकल्‍पनेत नक्‍कीच काहीतरी गोंधळ आहे.

नावातच सर्व काही आहे; कारण ते आपले (हिंदूंचे) अस्‍तित्‍व, संस्‍कृती, परंपरा, मूल्‍ये, आदर्श यांचे प्रतीक आहे. ‘आम्‍ही शांत आणि सहिष्‍णू आहोत’, या न्‍यूनगंडातून बाहेर येऊन विचार करूया. त्‍यामुळेच ‘इंडिया’चे नामकरण ‘भारत’ असे व्‍हायलाच हवे.

(साभार : सामाजिक माध्‍यम)