नाशिक येथील ‘श्री हरिहर’ गडाची स्‍वच्‍छता आणि संवर्धन !

‘श्री शिवस्‍वराज्‍य संवर्धन प्रतिष्‍ठान’चा उपक्रम !

स्वच्छतेच्या वेळी उपस्थित असलेले युवक

नाशिक – ‘श्री शिवस्‍वराज्‍य संवर्धन प्रतिष्‍ठान’ आणि प्रादेशिक वन विभाग, नाशिक यांच्‍या प्रयत्नातून श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्‍यात आले होते. या अंतर्गत वन विभाग कर्मचारी, तसेच प्रतिष्‍ठानचे पदाधिकारी आणि सभासद यांच्‍या साहाय्‍याने श्री हरिहर गड येथे स्‍वच्‍छता आणि संवर्धन यांसाठी श्रमदान करण्‍यात आले.

१. २० नोव्‍हेंबर २०२२ या दिवशी श्री शिवस्‍वराज्‍य संवर्धन प्रतिष्‍ठान यांच्‍या वतीने नाशिकच्‍या मुख्‍य वनसंरक्षक कार्यालयास पत्राद्वारे गडाच्‍या ठिकाणी स्‍वच्‍छता आणि संवर्धन यांच्‍या दृष्‍टीकोनातून काही कामे व्‍हावीत, अशी विनंती केली गेली होती. (प्रत्‍येक वेळी शिवभक्‍तांना स्‍थानिक प्रशासनास का विनंती करावी लागते ? गडाचे सौंदर्य अबाधित राखून स्‍वच्‍छता आणि संवर्धन करणे हे संबंधित प्रशासनाचे कार्य नाही का ? – संपादक)

२. यात गडावर स्‍वच्‍छता रहावी, यासाठी तेथे ठिकठिकाणी कचरापेटी बसवण्‍यात यावी. पर्यटकांनी गडाचे पावित्र्य राखावे, यासाठी सूचनाफलक लावावेत, तसेच पयर्टकांना विसाव्‍यासाठी आसनव्‍यवस्‍था करावी, यास मान्‍यता मिळाल्‍यावर गडावर ही कामे श्रमदानातून करण्‍यात आली.

या वेळी प्रतिष्‍ठानचे सभासद सर्वश्री अजित माने, प्रसाद पवार, संदीप लांघी, रोहित बांगर, रवी येडे, गणेश मेमाणे, प्रथमेश खोल्लम, अविनाश भांगरे यांसह प्रतिष्‍ठानचे ठाणे जिल्‍हा अध्‍यक्ष विकी रोंगटे आणि कार्याध्‍यक्ष अमोल आवटे आदींनी  सहभाग नोंदवला. या मोहिमेसाठी साहाय्‍य केलेल्‍या स्‍थानिक वन अधिकारी सौ. रत्ना भुजबळ आणि कर्मचारी यांचे यावेळी मनःपूर्वक आभार व्‍यक्‍त करण्‍यात आले.