गोवा : हणजूण येथे पर्यटक कुटुंबावर प्राणघातक आक्रमण

पर्यटनासाठी आलेल्या जतीन शर्मा यांच्या कुटुंबावर तलवार आणि चाकू यांच्या साहाय्याने आक्रमण

म्हापसा, १२ मार्च (वार्ता.) – हणजूण येथे पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर तलवार आणि चाकू यांच्या साहाय्याने आक्रमण करण्यात आले. या पर्यटकांनी स्वत: या घटनेची माहिती सामाजिक माध्यमाद्वारे दिली आहे. ‘गोवा हे सुरक्षित ठिकाण नाही’, असे यामध्ये लिहिले आहे.

पर्यटक जतीन शर्मा यांनी त्याच्या अधिकृत हँडलवरून ‘इन्स्टाग्राम’वर घटनेची २ चलचित्रे (व्हिडिओ) प्रसारित केली आहेत. पहिल्या चलचित्रामध्ये त्याच्यावर काही लोक तलवार आणि चाकू यांनी जोरदार प्रहार करतांना दिसत आहे आणि यामध्ये जतीन शर्मा रक्तबंबाळ झाल्याचे दिसत आहे. याच वेळी त्याची बहीण मोठ्याने रडतांना आणि भावाला सावरतांना दिसत आहे.

(सौजन्य : OHeraldo Goa)

जतीन शर्मा घटनेविषयी अधिक माहिती देतांना म्हणतात, ‘‘हणजूण येथे एका रिसॉर्टमध्ये आम्ही राहिलो होतो. तेथे गुंडांनी आमच्यावर आक्रमण केले. पोलिसांनी या प्रकरणी गुंडांच्या विरोधात सौम्य गुन्हा नोंदवला. स्थानिक गुंडांना साहाय्य करण्यासाठी हे करण्यात आले. हणजूण येथील ‘स्पॅझिओ लेझर रिसॉर्ट’ला भेट देऊ नका. आक्रमण करणार्‍यांमध्ये रोशन नावाचा हॉटेलचा कर्मचारी होता.’’

हणजूण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात खात्यांतर्गत कारवाईला आरंभ

खुनाचा प्रयत्न केल्याची घटना असतांना केवळ मारहाण झाल्याची नोंद केल्याच्या प्रकरणी पोलीस खात्याने हणजूण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात खात्यांतर्गत कारवाई आरंभली आहे. या प्रकरणी रायस्टन डायस (हणजूण), नॉयरोन डायस (हणजूण) आणि काशीनाथ आगरवाडेकर (हणजूण) हे संशयित आरोपी आहेत. पर्यटकांनी सामाजिक माध्यमातून या प्रकरणी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई आरंभली आहे.