आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण करणार ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत सांगितले. अक्कलकुवा (जिल्हा नंदुरबार) येथील सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी वसवलेल्या देवमोगरा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या आमलीबारी धरणाचे काम पूर्ण करण्याविषयी सदस्य एकनाथ खडसे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमलबारी धरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करून या योजनेत असलेली कामे उपसा सिंचनच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. कामाच्या सर्वेक्षणासाठी २८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीची मागणी वाढल्यास त्याचीही तरतूद करण्यात येईल. आमलीबारी देवमोगरा येथील काम पूर्ण होईपर्यंत येथील प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना सिंचन सुविधा अनुदान वाटप करण्यात आले आहे. उपसा सिंचन योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल.