गोवा : पैशांच्या लोभापायी पेडणे येथे देवस्थानच्या भूमीही विकण्याचा घाट

देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत

पेडणे, १० मार्च (वार्ता.) – तालुक्यातील अनेक मोकळ्या आणि डोंगर माळरान येथील भूमी देहली भागातील उद्योजकांनी निरनिराळ्या नावांनी विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. पैशांच्या लोभापायी देवस्थानच्या भूमीही विकल्या जात आहेत.

आश्वे, मांद्रे येथील श्री आजोबा मंदिरासहित तेथील भूमी विकल्यानंतर डोंगर माथ्यावरील श्री भूतनाथ मंदिर परिसरातील भूमी विकण्यासाठी सध्या भूमीमाफिया कार्यरत झालेले आहेत. या परिसरातील मोठ्या झाडांना आग लावून जंगल नष्ट करून त्या ठिकाणी भूखंड करणे आणि वेळप्रसंगी श्री भूतनाथ परिसरातील भूमीही विकण्याचा सध्या प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी एका बाजूला श्री हनुमानाचे स्थळ आहे आणि ठिकाणी भूमीचा १/१४ उतारा देवासमोर ठेवलेला दिसत आहे. भविष्यात ही भूमीही विकण्याचा हा प्रकार असू शकतो.

आपली संस्कृती आणि परंपरा ही मंदिरांवर अवलंबून ! – मांद्रे पंचायतीचे सरपंच अधिवक्ता अमित सावंत

मांद्रे पंचायतीचे सरपंच तथा अधिवक्ता अमित सावंत

याप्रसंगी मांद्रे पंचायतीचे सरपंच अधिवक्ता अमित सावंत म्हणाले, ‘‘गावाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपली संस्कृती आणि परंपरा ही मंदिरांवर अवलंबून आहे. अलीकडील काही मासांमध्ये देवस्थानच्या भूमी विकण्याचा घाट घातला जात आहे. आश्वे, मांद्रे येथील श्री आजोबा मंदिर परिसरातील भूमी मंदिरासह विकली गेली आहे. हे योग्य नाही, असे प्रकार इतरत्र चालू झाले आहेत. अशा प्रकारांना वेळीच आळा घातला पाहिजे.’’