रायगड जिल्ह्यात कायदेविषयक शिबिरे आणि फिरते लोकअदालत यांचे आयोजन !

अलिबाग – मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्या निर्देशानुसार ‘न्याय आपल्या दारी’ या संज्ञेअंतर्गत ९ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत रायगड जिल्ह्यात कायदेविषयक शिबिरे आणि फिरते लोक अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन समारंभ रायगड जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि रायगडचे सत्र न्यायाधीश श्रीमती एस्.एस्. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

कायदेविषयक शिबिर आणि फिरते लोकअदालत कार्यक्रमांचे नियोजन !

१४ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता संभे, रोहा पोलीस स्टेशन येथून या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दर्यागाव, पाली, माणगाव, महाड, श्रीवर्धन, पेण, उरण, पनवेल, कलोते, नेरळ पोलीस ठाणे येथे उपक्रम राबवण्यात येणार आहे.