वणव्यामुळे म्हादई अभयारण्याचे ३० लाख चौ.मी. जंगलक्षेत्र जळून खाक !

आगीत म्हादई अभयारण्याचे ३० लाख चौरसमीटर जंगलक्षेत्र जळून राख

पणजी, ७ मार्च (वार्ता.) – म्हादई अभयारण्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील साट्रे गावातील क्रांतीवीर दीपाजी राणे यांचा गड म्हणून प्रसिद्ध असलेले जंगल वणव्यात जळून खाक झाले आहे. साट्रे येथे लागलेली आग पुढे चोर्ला घाट, वाघेरी डोंगर, केरी आणि चरवणे या भागांत पसरली. ४ दिवस हे जंगल क्षेत्र जळत होते. वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारीवर्ग, सामाजिक कार्यकर्ते अन् पर्यावरणप्रेमी आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी ७ मार्च या दिवशी नौसेनेचे साहाय्य घेण्यात आले.

प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर म्हणाले, ‘‘आगीत म्हादई अभयारण्याचे ३० लाख चौरसमीटर जंगलक्षेत्र जळून राख झाले आहे.’’ या आगीमुळे दुर्मिळ जैवविविधता, तसेच काही बागायतदारांचे काजूचे पीकही नष्ट झाले आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी ही मनुष्यनिर्मित दुर्घटना असल्याचे विधान यापूर्वीच केले आहे. बागायती पिकांची लागवड करण्यासाठी कुणीतरी ही आग लावली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(सौजन्य : Prudent Media) 

पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर पुढे म्हणाले, ‘‘वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आग लागलेल्या ठिकाणी भेट देऊन संबंधित वन अधिकारी आणि शासकीय अधिकारी यांना मार्गदर्शन करून आग लावणार्‍या संबंधितांचा शोध घेण्याचा आदेश दिला आहे. हे प्रकरण गोव्याचे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे. असे प्रकार पुन्हा घडल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम गोमंतकियांना भोगावे लागणार आहेत.’’

साट्रे येथील क्रांतीवीर दीपाजी राणे गडावर आग लागली, तेव्हा स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी नागरिक यांनी हेलिकॉप्टरद्वारे आग विझवण्याची मागणी शासनाकडे केली होती.

वन अधिकार्‍यांनी आग विझवणारे तज्ञ आणि स्थानिक नागरिक यांच्या साहाय्याने साट्रे येथील आग विझवली; मात्र तोपर्यंत ती आग चोर्ला घाटात पोचली होती. चोर्ला येथील आग विझवण्यासाठी नौसेनेचे साहाय्य घेण्यात आले. ४ दिवसांनी आग विझवता आली; मात्र तोपर्यंत साट्रे येथील क्रांतीवीर दीपाजी राणे गड, चोर्ला, चरवणे आणि केरी येथील ३० लाख चौरसमीटर जंगलभूमी जळून खाक झाली.

वन्यजीव व्यवस्थापन योजनेच्या निधीचा २५ वर्षे वापर नाही !

पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर म्हणाले, ‘‘म्हादई अभयारण्य वर्ष १९९९ मध्ये अधिसूचित झाले. त्यावेळी वन्यजीव व्यवस्थापन योजना सिद्ध करण्यात आली होती; मात्र ही योजना पुढे कार्यान्वित करण्यात आली नाही. योजना कार्यान्वित न करण्याचे कारण वन खात्यालाच ठाऊक असावे. यामुळे केंद्राचा निधी मागील २५ वर्षे विनावापर राहिला आहे.’’ (राज्यसरकारने आणि केंद्रसरकार यांनी याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई होईल, असे पहावे ! – संपादक)

तापमानवाढीसह हवेतील अल्प आर्द्रता यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ  ! – हवामान खाते

राज्यात मागील ९८ घंट्यांमध्ये आगीसंबंधी २०८ घटनांची नोंद झाली आहे. २०८ मधील १७८ घटना या गवत, वनक्षेत्र, काजू बागायती आदींना आग लागणे, अशा स्वरूपाच्या आहेत. हवामान खात्याच्या मते तापमानात वाढ होण्यासह हवेत आर्द्रता अल्प असल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यंदा गोव्यात फेब्रुवारीमध्ये पूर्वीच्या वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक तापमान नोंद झाले होते.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन खात्याकडे कृती योजना नव्हती !

अभयारण्यात लागलेल्या सुमारे १ सहस्र काजूची झाडे, वन्यजीव आणि नैसगिक संपदा यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन खात्याकडे कोणतीही कृती योजना नव्हती. या घटनेमुळे वन खात्याकडे वन्यजीव व्यवस्थापन योजना कार्यान्वित नसल्याचे उघड झाले आहे, असा स्थानिकांचा आरोप आहे.

म्हादई अभयारण्यातील आगीवर नियंत्रण ! – विश्वजीत राणे, वनमंत्री

वन खात्याचे १५० कर्मचारी, ‘फायर ट्रॅकरर्स’, कामगार आणि स्थानिक नागरिक यांच्या एकूण १५ गटांना म्हादई अभयारण्यात लागलेली आग विझवण्यास यश आले आहे. अभयारण्यात साट्रे, चोर्ला घाट, पाळी आणि चरवणे या भागांत ही आग लागली होती. ही आग मनुष्यनिर्मित आहे आणि यासंबंधी अन्वेषण चालू आहे.

वार्‍यामुळे आग सर्वत्र पसरली. आग लागलेल्या सर्व ठिकाणांवर वन खात्याच्या अधिकार्‍यांनी इतर शासकीय अधिकार्‍यांसमवेत समन्वय करून ७ मार्च या दिवशी दुपारपर्यंत आग आटोक्यात आणली, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. भारतीय नौसेनेच्या ‘डार्नियर’ विमानाच्या माध्यमातून आग लागलेली ठिकाणे शोधून काढून आग विझवण्यात आल्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.