साधकांना वात्‍सल्‍यभावाने साहाय्‍य करणार्‍या आणि साधकांची साधना होण्‍यासाठी अथक प्रयत्नशील असणार्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये !

सद्गुरु स्वाती खाडये

‘गुरुदेवांच्‍या कृपेने मला सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या सत्‍संगात रहाण्‍याची संधी मिळाली. त्‍या वेळी मला त्‍यांच्‍यातील ‘साधकांचा सतत विचार करणे, आत्‍मीयता, गुरूंची शिकवण आचरणात आणण्‍याची तळमळ’ इत्‍यादी गुणांचे दर्शन झाले. ते त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.

१. साधकांप्रती वात्‍सल्‍यभाव

कु. वैभवी भोवर

‘सद़्‍गुरु स्‍वातीताई स्‍वतःसाठी अधिक वस्‍तू विकत घेत नाहीत; पण साधकांना काही घ्‍यायचे असेल, तर ‘कुठे काय चांगले मिळेल ? योग्‍य दरात मिळेल का ?’, याविषयी विचारपूस करून ‘कुणाला त्‍याविषयी चांगली माहिती आहे’, असे संबंधित साधकांना त्‍या सुचवतात आणि साधकांना साहाय्‍य करतात. त्‍यांच्‍यातील साधकांविषयी असलेली आत्‍मीयता, प्रीती अशा प्रसंगांत सातत्‍याने अनुभवता येतेे आणि त्‍यांचा पुष्‍कळ आधार वाटतो.

२. साधकांच्‍या घरी गेल्‍यावर कुटुंबियांना साहाय्‍य करणे

सद़्‍गुरु स्‍वातीताई गणेशचतुर्थीच्‍या कालावधीत माझ्‍या घरी दर्शन आणि महाप्रसाद घेण्‍यासाठी आल्‍या होत्‍या. त्‍या घरी आल्‍यावर पाय धुऊन थेट स्‍वयंपाकघरात गेल्‍या आणि त्‍यांनी माझ्‍या आईला साहाय्‍याविषयी विचारले.

३. कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांच्‍या साधनेची घडी बसवणे

सद़्‍गुरु स्‍वातीताई यांच्‍या आईंचे (कै. (श्रीमती) नलंदा खाडये (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के)) निधन झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या मृत्‍यूत्तर विधींसाठी सद़्‍गुरु स्‍वातीताई कुडाळ येथे आल्‍या होत्‍या. नंतर त्‍या कुडाळ सेवाकेंद्रात आल्‍या.

३ अ. साधकांसमवेत सेवा करून सेवाकेंद्रातील सेवांची घडी बसवणे : सद़्‍गुरु स्‍वातीताईंनी सेवाकेंद्रातील साधकांच्‍या साधनेची घडी बसवण्‍यासाठी वेळ देऊन पुष्‍कळ कष्‍ट घेतले. त्‍या साधकांच्‍या समवेत सेवा करायच्‍या. त्‍यांनी स्‍वतःचे वेगळे अस्‍तित्‍व ठेवले नाही. त्‍यांच्‍या समवेत ज्‍या वयाचे साधक असतील, त्‍या साधकांच्‍या वयाच्‍या होऊन ताई वावरायच्‍या. त्‍यामुळे साधकांना त्‍यांच्‍या सहवासात पुष्‍कळ आनंद मिळाला.

३ आ. सेवाकेंद्रात साधकसंख्‍या अल्‍प असतांना सेवाकेंद्रातील सेवेचे नियोजन करणे : सेवाकेंद्रात साधकसंख्‍या अल्‍प होती. सद़्‍गुरु ताईंनी जिल्‍ह्यातील युवा, तसेच अन्‍य साधक यांचे नियोजन करून सेवाकेंद्रातील सेवा करवून घेतल्‍या. त्‍यांच्‍या प्रेरणेमुळे सर्व वयोगटांतील साधक सेवाकेंद्रात रहाण्‍यासाठी आले. त्‍यामुळे साधकांना पुष्‍कळ उत्‍साह, समष्‍टीतील संघभाव आणि आनंद अनुभवता आला.

३ इ. सेवाकेंद्रातील साधकांच्‍या व्‍यष्‍टी साधनेची घडी बसवणे : ‘साधकांचा नामजप व्‍हावा’, यासाठी सद़्‍गुरु ताईंनी साधकांना सामूहिक नामजपाची वेळ ठरवून दिली. सर्व साधकांनी स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची सारणी लिहिण्‍यासाठी रात्री एकत्र बसण्‍याचे नियोजन केले. साधकांनी स्‍वयंसूचना सत्रे करणे आणि शरिरावरील त्रासदायक आवरण काढणे, यांच्‍या फलकावर नोंदी करण्‍याचे नियोजन केले.

३ ई. सद़्‍गुरु स्‍वाती खाडये रहात असलेल्‍या खोलीतील चैतन्‍यात वाढ झाल्‍यामुळे त्‍याचा साधकांना आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ होणे : सद़्‍गुरु स्‍वातीताई कुडाळ सेवाकेंद्रात ज्‍या खोलीत रहायच्‍या, त्‍या खोलीत त्‍यांचे अजूनही अस्‍तित्‍व जाणवते. सद़्‍गुरु स्‍वातीताईंमधील चैतन्‍याने खोलीतील लाद्या गुळगुळीत झाल्‍या आहेत. साधक त्‍या खोलीत आल्‍यावर त्‍यांचा एकाग्रतेने नामजप होतो. साधकांना खोलीत हलकेपणा जाणवतो आणि ‘स्‍वतःवर उपाय होत आहेत’, असे जाणवते.

४. सद़्‍गुरु स्‍वाती खाडये कुडाळ सेवाकेंद्रात आल्‍यानंतर तेथील मांजराविषयी लक्षात आलेली सूत्रे

‘ब्‍लूटूथ’ ध्‍वनीवर्धकावर चालू असलेला सत्‍संग डोळे  मिटून ऐकतांना कुडाळ सेवाकेंद्रातील सात्त्विक मांजर

४ अ. मांजराचे पिल्लू सेवाकेंद्रात आणल्‍यावर त्‍याला अनेक त्रास होणे : कुडाळ सेवाकेंद्रात सद़्‍गुरु ताई असतांना एक मांजराचे पिल्लू आणले होते. मांजर सेवाकेंद्रात आल्‍यावर त्‍याला अनेक त्रास व्‍हायचे. त्‍याला १ – २ वेळा रुग्‍णालयातही न्‍यावे लागले. ‘सद़्‍गुरु किंवा संत आश्रमात नसले की, ते मांजर आजारी पडायचे किंवा हरवायचे’, असे ३ वेळा झाले.

४ आ. ‘सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी मांजराला ‘आजारी पडू नकोस’, असे सांगणे आणि त्‍यानंतर मांजर आजारी न पडणे : सद़्‍गुरु स्‍वातीताई कुडाळ सेवाकेंद्रातून अन्‍य ठिकाणी जायला निघतांना त्‍यांनी मांजराला चैतन्‍य मिळावे; म्‍हणून त्‍याच्‍यावर सनातनच्‍या भीमसेनी कापराची पूड टाकली आणि ‘आजारी पडू नकोस हं’, असे त्‍याला म्‍हणाल्‍या. तेव्‍हा ‘त्‍यांचा संकल्‍प झाला’, असे मला वाटले. तेव्‍हापासून आजपर्यंत मांजर कधीच आजारी पडले नाही किंवा हरवलेही नाही.

४ इ. सद़्‍गुरु  स्‍वाती खाडये सत्‍संगात बोलत असतांना मांजर त्‍यांच्‍या चरणांजवळ येऊन बसणे : सद़्‍गुरु ताई पुन्‍हा सेवाकेंद्रात आल्‍यानंतर त्‍या मांजरामध्‍ये बरेच पालट झाले. ते आरती चालू असतांना, साधक नामजप करतांना आणि सत्‍संगाच्‍या वेळी तेथे येऊन शांतपणे बसते. सद़्‍गुरु ताई सत्‍संगात बोलत असतांना ते त्‍यांच्‍या चरणांजवळ येऊन बसते.

४ ई. ‘मुक्‍या प्राण्‍यांचाही उद्धार व्‍हावा’, यासाठी त्‍यांच्‍यावरही प्रीती करणार्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये ! : सद़्‍गुरु स्‍वातीताई अन्‍य ठिकाणी गेल्‍यानंतर अनुमाने एक आठवडा मांजर त्‍यांच्‍या खोलीच्‍या बाहेर येऊन फेर्‍या मारायचे. तेव्‍हा ते ‘सद़्‍गुरु ताईंना शोधत आहे’, असे मला जाणवायचे. सद़्‍गुरु ताईंनी त्‍या मुक्‍या जिवावरही प्रीती केली. सद़्‍गुरु ताई बाहेरून आल्‍यावर त्‍या मांजराला हाक मारायच्‍या. ते पळत सद़्‍गुरु ताईंकडे यायचे, जणू तेही त्‍यांची वाटच बघत असायचे.

यातून एकच शिकायला मिळाले, अनुभवता आले आणि मनावरही बिंबले, ‘सद़्‍गुरु अन् संत यांच्‍या सहवासात आणि आश्रमातील चैतन्‍यदायी वातावरणात राहिल्‍याने मुक्‍या प्राण्‍यांतही साधनेच्‍या प्रयत्नांची ओढ निर्माण होऊन त्‍यांच्‍यात सात्त्विकता वाढू शकते, तर आम्‍हा साधक जिवांचा उद्धार निश्‍चितच होणार आहे.’

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

सद़्‍गुरु स्‍वातीताईंविषयी कितीही लिहिले, तरी अल्‍पच आहे. ‘त्‍यांच्‍याकडून मला शिकण्‍याची संधी मिळत आहे’, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता ! ‘हे गुरुमाऊली, तुम्‍हाला अपेक्षित असा सद़्‍गुरु स्‍वातीताईंच्‍या सत्‍संगाचा मला लाभ करून घेता येऊ दे’, अशी आपल्‍या चरणी प्रार्थना !’

– कु. वैभवी सुनील भोवर (वय २५ वर्षे, वर्ष २०२२ मधील आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के), कुडाळ सेवाकेंद्र, जिल्‍हा सिंधुदुर्ग. (२.३.२०२२)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक