मिरज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली जिल्ह्याचे ‘युथ लीडर्स समिट २०२३’ हे जिल्हा संमेलन बालगंधर्व नाट्य मंदिर, मिरज येथे पार पडले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रतिनिधींना तज्ञांच्या माध्यमातून या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. संमेलनाचे उद़्घाटक म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते श्री. अभय भंडारी यांनी ‘भारतीय शिक्षणपद्धती आणि स्वामी विवेकानंद’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. अभाविपच्या ७५ वर्षांची ‘ध्येय यात्रा’ या विषयाची मांडणी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अमोघ कुलकर्णी यांनी मांडली.
शासनाच्या उद्योजकतेला प्राधान्य देण्यासाठीच्या विविध योजना आणि त्याला लागणारे सहकार्य हे शासनाद्वारे सर्वतोपरी केले जाईल, असे आश्वासन ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळा’चे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिले. आगामी काळात विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या कार्यक्रम-उपक्रम यांची माहिती जिल्हा संयोजक दर्शन मुंदडा यांनी दिली. संमेलनाच्या शेवटी बालगंधर्व नाट्यमंदिर ते किसान चौक अशी शोभायात्रा काढण्यात आली.