कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडून भ्रमणभाष संच कह्यात !

पणजी, ५ मार्च (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ५ मार्च या दिवशी पोलीस महानिरीक्षकांनी आकस्मिक भेट दिली असता बंदीवानांकडून भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले. बंदीवानांकडून एकूण ८ भ्रमणभाष संच, चार्जर, ‘हेडफोन’, ‘स्पीकर’ आदी कारागृहात वापरण्यास प्रतिबंधित असलेल्या वस्तू कह्यात घेण्यात आल्या. कारागृहातील अवैध कामांना आळा घालण्यासाठी देखरेख अधिक कठोरतेने करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. (असा आदेश का द्यावा लागतो ? – संपादक)

गत मासात आकस्मिकपणे कारागृहाच्या अधिकार्‍यांनी घातलेल्या छाप्यामध्ये बंदीवानांकडून ४५ भ्रमणभाष संच, चार्जर आणि अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले होते. प्राप्त माहितीनुसार कारागृहात प्रवेश करणारे बंदीवान आणि कर्मचारी यांची तपासणी करण्यात येत असली, तरी त्या ठिकाणी त्यांचे साहित्य तपासण्यासाठी ‘स्कॅनर’ नाही. ‘बॅगेज स्कॅनर’चा प्रस्ताव सरकार दरबारी पडून आहे. कारागृहात नेण्यात येत असलेल्या धान्यातून किंवा कारागृहातील कर्मचारी आणि बंदीवान यांच्यामधील साटेलोटे यांच्यामुळे भ्रमणभाष संच कारागृहात नेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संपादकीय भूमिका

पहारा आणि अनेक तपासण्या असतांना कारागृहात या वस्तू कशा जातात ? कामचुकारपणा केल्याच्या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी !