देहू (पुणे) येथे संत श्री तुकाराम महाराज बीजेची जोरात सिद्धता !

देहू (जिल्हा पुणे) – जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा ९ मार्च या दिवशी होत आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पूर्ण सिद्धता करण्यात येत आहे. भाविकांकरिता आरोग्य, निवारा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय संस्थानने केली आहे. संत तुकाराम महाराज देऊळवाड्याला विद्युत् रोषणाईही करण्यात आली आहे. या सोहळ्याचे यंदाचे ३७५ वे वर्ष आहे. राज्यातून तसेच परराज्यातूनही भाविक ‘संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्या’साठी येतात, अशी माहिती संस्थानच्या वतीने विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली.

विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले की, यंदा इंद्रायणी नदीत पाणीसाठा भरपूर आहे; परंतु त्यात सांडपाणी सोडले जात आहे. देहू नगरपंचायत प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गावातील सांडपाणी नदीत सोडू नका, अशी मागणी आम्ही केली आहे. वैकुंठगमन स्थानाजवळ प्रतिदिन सांडपाणी सोडले जात आहे. त्याच ठिकाणी भाविक स्नान करून तीर्थ म्हणून तेच पाणी पितात, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे दायित्व प्रशासनाचे असेल.