वेणूवादनाद्वारे भगवद्भक्ती करून संतपदी विराजमान झालेले, समस्त कलोपासकांसाठी आदर्शवत् असे पू. पं. डॉ. केशव गिंडे !

एरंडवणे, पुणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात ‘अमूल्य ज्योती आणि केशव वेणू प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने पू. पं. डॉ. केशव गिंडे यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने ४ आणि ५ मार्च या दिवशी ‘वेणूगंधर्व संगीत महोत्सव’ साजरा होत आहे. या सोहळ्याला करवीर पीठाचे विद्यमान जगद्गुरु शंकराचार्य प.प. विद्यानृसिंह भारती स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने ५ मार्च या दिवशी सकाळी ९.३० वाजता पू. पं. डॉ. केशव गिंडे आणि शिष्य यांचे ‘कल्याण नवरंग सागर’ या नावाने सादरीकरण होणार आहे. यासह विदुषी मंजिरी आलेगावकर, पं. प्रसाद खापर्डे यांचे गायन, तसेच बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी अन् व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांची जुगलबंदी होणार आहे. दुपारी ४ वाजता बासरीवादक श्री. अमर ओक यांचा ‘अमर बन्सी’ आदी कार्यक्रम होतील. या वेळी ‘पू. पं. डॉ. केशव गिंडे  जीवनचरित्र’ या ग्रंथाचे प्रकाशन, तसेच चित्रफीत सादरीकरण अन् सहस्रचंद्रदर्शन सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा शुभेच्छा संदेश प्रसिद्ध करत आहोत.

पू. पं. डॉ. केशव गिंडे

१. अल्प कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाशी आत्मीयतेने जोडले गेलेले प्रीतीस्वरूप संत !

‘पुणे येथील सुप्रसिद्ध वेणूवादक पूज्य पं. डॉ. केशव गिंडे यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण केल्याकरता प्रथम त्यांच्या चरणी वंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. पू. पं. डॉ. केशव गिंडे यांचे आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ऋणानुबंध गेल्या अवघ्या ४ वर्षांतील आहेत; परंतु एवढ्या अल्प कालावधीत त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला अगदी आपलेसे केले आहे. पू. पं. डॉ. गिंडे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या, गोवा येथील संशोधन केंद्रास आतापर्यंत दोन वेळा भेट दिली आहे आणि त्यांचे सुमधुर वेणूवादनही सादर केले आहे. संशोधन केंद्रातील साधक अन् मी स्वतःही पू. पं. डॉ. गिंडे यांना भेटण्यास अन् त्यांचे वेणूवादन ऐकण्यास नेहमीच फार उत्सुक असतो.

‘केशववेणू’ वाजवतांना पू. पं. डॉ. केशव गिंडे

२. पू. पं. डॉ. गिंडे यांचे साधकांना आध्यात्मिक अनुभूती देणारे वेणूवादन !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या, गोवा येथील संशोधन केंद्रात अनेक मास प्रतिदिन सकाळी ८ ते ८.१० या वेळेत पू. पं. डॉ. गिंडे यांनी बासरीवर वाजवलेले वेगवेगळे राग लावण्यात येत होते. ते केवळ १० मिनिटांचे बासरीवादन ऐकतांनाही संशोधन केंद्रातील साधकांना आनंद जाणवणे, कृष्णलोकात असल्याप्रमाणे वाटणे, मन निर्विचार होणे, ध्यान लागणे, अशा अनेकविध अनुभूती येत. या अनुभूतींवरून पू. पं. डॉ. गिंडे यांचे संतत्व अधोरेखित होते.

‘श्रीकृष्णाने तुमच्याशी आमची भेट घडवून आणली’, असे पू. पं. केशव गिंडे यांना सांगतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

३. ‘कलायोगा’चे मूर्तीमंत उदाहरण !

सर्व अभिजात भारतीय कला या ईश्वरनिर्मित आहेत. त्यांचा जन्म ‘कलावंताने कलेच्या माध्यमातून ईश्वराची आराधना करावी, त्याला आणि त्याच्या कलेचा अास्वाद घेणार्‍यांना ईश्वराची अनुभूती घेता यावी आणि कलावंत आध्यात्मिकदृष्ट्या उच्च पदाला पोचून जीवन्मुक्त व्हावा’, यांसाठी झाला आहे; परंतु आजच्या कलियुगात कलाक्षेत्राला धनाचा लोभ, प्रसिद्धीची लालसा, कलेचा अहंकार इत्यादी दोषांनी ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर पू. पं. डॉ. गिंडे यांनी पूर्णतः अध्यात्मपरायण आयुष्य जगत वेणूवादनाच्या माध्यमातून कलासाधनेचा नंदादीप अखंड तेवत ठेवला आहे. एवढेच नव्हे, तर कलानिष्ठा, विनम्रता, अनासक्ती, अहंभावाचा लवलेश नसणे, यांद्वारे स्वतःच्या शिष्यांच्या हृदयातही कलासाधनेची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला आहे.

४. पू. पं. डॉ. गिंडे यांनी सिद्ध केलेली दैवी अनुभूती देणारी ‘केशववेणू’ !

ईश्वराच्या प्रेरणेने पू. पं. डॉ. गिंडे यांनी स्वतः संशोधन करून सिद्ध केलेली ‘केशववेणू’ ही त्यांनी जगाला दिलेली अनमोल भेट आहे. पू. पं. डॉ. गिंडे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात ‘केशववेणू’ वाजवत असतांना अनेक साधकांना त्या स्थळी श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले. पारंपरिक वेणूपेक्षा ‘केशववेणू’च्या नादाचा सकारात्मक आध्यात्मिक परिणाम पुष्कळ अधिक असल्याचे संशोधनाअंती लक्षात आले आहे. हे ‘केशववेणू’चे वैशिष्ट्य तर आहेच; पण ती पू. पं. डॉ. गिंडे यांच्यासारख्या संतांनी वाजवली असल्यामुळे तिची परिणामकारकता अधिक आहे, हे सत्य दृष्टीआड करून चालणार नाही.

पू. पं. डॉ. गिंडे यांच्यासारख्या कलायोगी संतांचा सत्संग आम्हाला लाभला आणि ‘संगीतातून साधना कशी केली जाते ?’, याचे प्रत्यक्ष उदाहरण अनुभवायला मिळाले, याकरता मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

‘पू. पं. डॉ. गिंडे यांची कलासाधना अधिकाधिक उच्च स्तरावर जावी आणि त्याद्वारे त्यांची पुढील आध्यात्मिक उन्नतीही जलद गतीने व्हावी’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (१५.१.२०२३)