परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्याम राजंदेकर (वय ७७ वर्षे) यांना सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन !

‘नोव्हेंबर २०१८ मध्ये मी वैयक्तिक कामानिमित्त घरी गेलो होतो आणि ६ मासांनी पुन्हा देवद आश्रमात आलो. ६.६.२०१९ या दिवशी सकाळी ९ वाजता मी नामजप करण्यासाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत बसलो होतो. तेंव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला सुक्ष्मातून मार्गदर्शन केले.

१. ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या छायाचित्रातून पांढरा शुभ्र प्रकाश बाहेर पडत आहे’, असे दिसणे आणि ‘ते छायाचित्राच्या माध्यमातून माझ्याशी बोलत आहेत’, असे जाणवणे 

परात्पर गुरु पांडे महाराज

‘परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या छायाचित्रातून पांढरा शुभ्र प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला दिसले. त्या प्रकाशाच्या माध्यमातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होऊन त्याचा मला लाभ होत होता. परात्पर गुरु पांडे महाराज यांना अकोला येथील साधक भेटायला आल्यावर पुष्कळ आनंद होत असे आणि त्यांच्याशी ते अधिक आपुलकीने अन् प्रेमाने बोलत असत. त्यांच्या मार्गदर्शनातून पुष्कळ शिकायला मिळायचे. मला त्यांच्या छायाचित्रातून शब्द ऐकू येत होते. त्यांनी मला सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

२. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन !

श्री. श्याम राजंदेकर

२ अ. ते मला म्हणाले, ‘पुष्कळ कालावधी घरी घालवलात. आता आश्रमातील दिवाळीचा आनंद घ्या.’

२ आ. गुरुकृपा झाल्यावर केवळ गुरूंचे आज्ञापालन करायचे असते ! : गुरुकृपा झाल्यावर ‘गुरूंचे आज्ञापालन करणे’, एवढाच भाग रहातो. मी अजूनही (देहत्यागानंतरही) त्यांचे आज्ञापालन करतो. त्यांच्या चरणांशी लीन होण्यासाठी एक दिवस आधीच मी वैकुंठात आलो; कारण लगेच (परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर दुसर्‍याच दिवशी) महाशिवरात्र होती. आम्हाला नेण्यासाठी इकडे विष्णुदूत आणि शिवदूत आले. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून तेथे आले आणि म्हणाले, ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मंत्रजपाद्वारे साधकांवर उपाय केले आहेत. ते शिवलोकातून साधकांवर निर्गुण स्तरावर उपाय करतील.’ तेव्हा विष्णुदूतांनी आज्ञापालन केले आणि शिवदूत आम्हाला घेऊन आले. मला परात्पर गुरु डॉक्टरांचीच आज्ञा घ्यायची होती.

२ इ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘झोकून देऊन सेवा करणे, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याशी एकरूप होणे’, असे सांगणे

परात्पर गुरु पांडे महाराज : झोकून देऊन सेवा करा.

मी : स्वभावदोष विरहित, अशी अधिकाधिक सेवा करीन.

परात्पर गुरु पांडे महाराज : अहो, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्याशी एकरूप होणे, म्हणजे झोकून देऊन सेवा करणे’, असे आहे. आपली काय बिशाद आहे, काही करायची ? परात्पर गुरु डॉ. आठवले चैतन्याने सर्व करतात. त्यांच्याशी एकरूप होणे, म्हणजे झोकून देणे.

२ ई. परात्पर गुरु डॉक्टरांना ‘समष्टी सेवा’ प्राणप्रिय असल्यामुळे साधकांनी भावपूर्ण आणि चैतन्याच्या स्तरावर सेवा केल्यास त्यांना आनंद होणे

परात्पर गुरु पांडे महाराज : रमेश कुणाचे नाव आहे ?

मी (काहीच न सुचून) : पू. गडकरीकाका यांचे नाव रमेश आहे.

परात्पर गुरु पांडे महाराज : श्रीविष्णुसहस्रनाम कधी वाचले आहे का ? श्रीविष्णूचे नाव रमेश आहे.(रमा हे लक्ष्मीचे नाव आहे.) शिव विष्णूचा आणि विष्णु शिवाचा नामजप करतात. बरोबर ? मग ‘रामं रमेशम् भजे ।’ हे कसे आले ? स्वतःच स्वतःचे नाम घेणार का ? स्वतःचे स्वरूप आठवणे, म्हणजे ‘स्व’चे नाम घेणे. ते कधी होते ?

श्रीविष्णु आणि श्रीकृष्ण यांना पारिजातकाचे फूल वहातो ना ? ते कुठे पडते ? ‘भू’वर, म्हणजे भूमीवर, म्हणजे पारिजातकाचे फूल आधी श्री लक्ष्मीला अर्पण होते. नंतर श्रीमन्नारायणाला अर्पण होते. ‘पारिजात’ समुद्रमंथनातून वर आलेला आहे. तुम्हाला दिलेली प्रत्येक सेवा ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चिंतनातून, म्हणजे चैतन्यातून वर आली आहे.

तुम्ही भूमीवर राहून सेवा करता, म्हणजे ती सेवा आधी श्री लक्ष्मीला अर्पण होते आणि नंतर श्रीमन्नारायणाला ! ते प्रसन्न होऊन संतुष्ट होतात. प.पू. डॉक्टरांना ‘समष्टी सेवा’ प्राणप्रिय आहे. ती साधकांनी भावपूर्ण आणि चैतन्याच्या स्तरावर केल्यास ते साधकांमध्ये आपले स्वरूप पहातात. त्यांना आनंद होतो.

समजले का ? ‘रामं रमेशम् भजे ।’ आहे कि नाही गंमत ?

३. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपामुळे साधकांना चैतन्य मिळणे 

परात्पर गुरु पांडे महाराज माझ्याशी छायाचित्रातून बोलत होते. तेव्हा काही साधिका नामजप करण्यासाठी तेथे बसल्या होत्या. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या निरनिराळ्या मंत्राजपांद्वारे एकाच वेळी त्यांना चैतन्य मिळत होते. माझी पत्नी (सौ. विमल राजंदेकर) तेथे नामजपाला बसली होती. तेव्हा ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी तिला दिलेला मंत्रजप त्यांच्या आवाजात ऐकू येत होता’, असे तिने मला सांगितले.

हे गुरुमाऊली, मला संतांचे बोलणे कळत नाही. आपण ते माझ्या लक्षात आणून दिले आणि माझ्याकडून शब्दबद्ध करून घेतलेत. त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. ‘गुरुदेवा, आपणच आमच्यात चैतन्याच्या स्तरावर साधना आणि सेवा करण्याची क्षमता निर्माण करावी’, अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. श्याम राजंदेकर (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७७ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.७.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक