वाहतूक समस्‍या ?

‘वाहनचालक मोठ्या प्रमाणात दंड भरतात; पण नियमांचे पालन करत नाहीत, असे दिसून आले असून वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्‍यासाठी जनमताच्‍या पाठबळाची शासनाला आवश्‍यकता आहे’, असे मत गोवा राज्‍याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केले. वास्‍तविक पहाता गोवा राज्‍यात चांगल्‍या पायाभूत सुविधा असूनही वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि अपघात यांसाठी मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्‍याचे वाढते प्रमाण निश्‍चितच चिंताजनक आहे, ही खंत गुदिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केली.

नुकतेच वर्ष २०२३ आगमनाच्‍या आनंदात १ जानेवारी या दिवशी एकट्या मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ८ सहस्रांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. ९ – १५ जानेवारी या सप्‍ताहात पिंपरी-चिंचवडमध्‍ये वाहतूक पोलिसांनी कारवाई करत ४ सहस्रांहून अधिक जणांकडून ४० लाख रुपये दंड वसूल केला. थोडक्‍यात काय, तर हा बेशिस्‍तपणा थोड्या फार प्रमाणात भारतात सर्वत्रच आढळतो. हे अत्‍यंत गंभीर आहे.

यांमध्‍ये विनाशिरस्‍त्राण, भ्रमणभाषवर बोलत आणि विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, अतीवेगाने अन् ‘सिग्‍नल’चे उल्लंघन करत वाहन चालवणे, वाहनात क्षमतेेपेक्षा अधिक जणांना बसवणे, असे अनेक गुन्‍हे घडत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्‍याने झालेल्‍या अपघातात अपघातग्रस्‍त, त्‍यांचे कुटुंब यांची अपरिमित हानी होते. कायमचे अपंगत्‍व किंवा मृत्‍यूही ओढवतो. तरीही ‘आ बैल मुझे मार’, अशा पद्धतीने आपण का वागतो ? आपल्‍याला मिळालेल्‍या मनुष्‍य जन्‍माचे अनमोलत्‍व आपण का विसरतो ? याचे आत्‍मपरीक्षण करण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे.

दुसरे असे की, राष्‍ट्राच्‍या उभारणीमध्‍ये कायदा-सुव्‍यवस्‍था टिकून रहाण्‍यासाठी जनता आणि शासनकर्ते अथवा प्रशासन दोघांचाही परिपूर्ण सहभाग असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. बर्‍याचदा असे लक्षात येते की, जनतेला सुखसोयी, सुविधा आणि अधिकार हवे असतात; मात्र त्‍या अनुषंगाने घालून दिलेल्‍या नियमांचे पालन करण्‍याची सिद्धता नसते. वाहतूक नियमांचे पालन करणे, हेेच जनतेचे कर्तव्‍य आहे. कर्तव्‍य आणि अधिकार या नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत. कुठलीही एक बाजू हवी, असा अट्टहास निरर्थक आहे. त्‍यासाठी घरापासूनच शिस्‍त लावायला हवी. मुळात महापालिका, पोलीस यंत्रणा आणि लोकसहभागातूनच शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सुटू शकेल. नागरिकांनी स्‍वत:ला शिस्‍त लावली, तर काही प्रमाणात प्रश्‍न निश्‍चितच सुटेल.

– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.