सोलापूर येथील ‘हिंदु गर्जना मोर्च्‍या’च्‍या संयोजकांसह २० जणांवर गुन्‍हा नोंद !

सोलापूर येथील ‘हिंदु गर्जना मोर्चा’

सोलापूर – येथे २६ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्‍या वतीने ‘हिंदु गर्जना मोर्च्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. मोर्च्‍याच्‍या वेळी दुकानांवर बाटल्‍या फेकल्‍याच्‍या प्रकरणी मोर्च्‍याच्‍या संयोजकांसह २० जणांवर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला. याविषयी महिला पोलीस उपनिरीक्षक राधा नारायण जेऊघाले यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून मोर्च्‍याचे आयोजक अंबादास गोरंटला, रंगनाथ बंकापुरे, पुरुषोत्तम कारकल, रवी गोणे यांच्‍यासह २० जणांवर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विकास देशमुख अन्‍वेषण करत आहेत. (हिंदुत्‍वनिष्‍ठांवर गुन्‍हे नोंद करण्‍यास तत्‍परता दाखवणारे पोलीस रामनवमी, हनुमान जयंती यांच्‍या मिरवणुकांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर गुन्‍हे नोंदवण्‍यास अशी तत्‍परता दाखवतात का ? – संपादक)

गुन्‍हे मागे घ्‍या, अन्‍यथा उच्‍च न्‍यायालयात जाऊ ! – धनंजय देसाई, संस्‍थापक, हिंदु राष्‍ट्र सेना

हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय‎ देसाई

हिंदु गर्जना मोर्च्‍यात घडलेल्‍या अप्रिय घटनेला उत्तरदायी धरून पुरावे नसतांना संयोजकांविरुद्ध पोलिसांनी गुन्‍हे नोंद केले आहेत. हे गुन्‍हे मागे घ्‍यावेत. अन्‍यथा उच्‍च न्‍यायालयात जाऊ, अशी चेतावणी हिंदु राष्‍ट्र सेनेचे संस्‍थापक धनंजय देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.