‘प्रत्‍येक क्षणी अष्‍टांग साधनेचे प्रयत्न चालू असावे’, अशी तळमळ असलेली कु. वेदिका दहातोंडे (वय १६ वर्षे) !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगाच्‍या वेळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहाणारी दैवी बालसाधिका कु. वेदिका अशोक दहातोंडे (आध्‍यात्मिक पातळी ५७ टक्‍के, वय १६ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

कु. वेदिका दहातोंडे

१. सत्‍संग चालू असतांना मनात तुलनेचे विचार असल्‍याने शिकण्‍याच्‍या स्‍थितीत नसणे

एकदा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग चालू असतांना माझ्‍या मनात विचार आला, ‘माझे मनाकडे लक्ष नाही. केवळ साधक बोलत आहेत, त्‍याकडेच लक्ष आहे.’ त्‍यामुळे मी ‘माझ्‍या मनात काय विचार चालू  आहेत ?’, याकडे लक्ष दिले. तेव्‍हा माझ्‍या मनात ‘अन्‍य साधकांना जे सुचले, ते मला का सुचले नाही ?’, असा तुलनेचा विचार येत होता. त्‍या वेळी ‘माझी शिकण्‍याची स्‍थिती नव्‍हती’, हे माझ्‍या लक्षात आले.

२. सत्‍संग ऐकत असतांना मनातून आपोआप ‘निर्विचार’ हा नामजप चालू असणे

त्‍यानंतर माझा ‘निर्विचार’, हा नामजप आपोआप चालू झाला. मनात नामजप चालू असला, तरी सत्‍संगातील सूत्रे ऐकण्‍यास अडथळा येत नव्‍हता. ‘नामजप आणि सत्‍संग ऐकणे दोन्‍ही एकाच वेळी होत आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेनेच मला हे अनुभवता आले.

३. ‘प्रत्‍येक क्षणी अंतर्मनात साधनेचे प्रयत्न चालूच असले पाहिजेत’, असे वाटणे

‘मनात तुलनेचे किंवा अन्‍य कोणतेही विचार नकोत, हे शिकवण्‍यासाठीच देवाने मला सत्‍संगात आपोआप नामजप होण्‍याची स्‍थिती अनुभवायला दिली. गुरुभेटीतील आनंदाचा क्षण किंवा कोणताही प्रसंग असो, प्रत्‍येक क्षणी अंतर्मनात गुरुमाऊलींनी सांगितलेले अष्‍टांग साधनेचे प्रयत्न चालूच असले पाहिजेत’, असे मला वाटले. ‘सतत आनंद मिळवण्‍याच्‍या स्‍थितीला मला पोचायचे आहे’, हे मला देवाने जणू सांगितले.

४. ‘प्रत्‍येक क्षणी स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवायला हवी’, असे वाटणे

समष्‍टीत सेवा करतांना आपण आपल्‍या मनाकडे सतर्कतेने लक्ष देतो. मनात चुकीचे किंवा अयोग्‍य विचार आल्‍यास त्‍यांची नोंद करतो आणि सारणी लिखाण (स्‍वतःकडून झालेल्‍या चुका लिहून त्‍यावर योग्‍य स्‍वयंसूचना देणे) करून स्‍वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतो; पण केवळ सेवा करतांनाच नाही, तर प्रत्‍येक क्षणी ‘स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ सतत राबवायला हवी’, असे मला वाटते.

५. एकदा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात एका साधकाचा भाव जागृत झाला. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणाले, ‘‘माझा असा भाव कधीच जागृत होत नाही !’’ त्‍या वेळी माझ्‍या मनात पुढील विचारप्रक्रिया झाली. ‘गुरुदेव (परात्‍पर गरु डॉक्‍टर), तुम्‍हीच सर्व साधकांमध्‍ये भाव निर्माण केला आहे आणि तो तुमचाच प्रसाद आहे.’

६. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘गुरुदेवा, तुमच्‍या चरणांशी एकरूप होण्‍यासाठी तुम्‍हीच माझ्‍याकडून तुम्‍हाला अपेक्षित असे प्रयत्न करून घ्‍या. तुमचीच ही शब्‍दपुष्‍पे तुमच्‍या चरणी समर्पित करत आहे. ‘देवा, ‘स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन’ यांचे प्रयत्न सतत करण्‍यासाठी तूच मला बळ दे’, अशी प्रार्थना करते. ‘प्रत्‍येक क्षणी नामजप अन् व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न व्‍हायला हवेत’, हे मला देवानेच शिकवले. त्‍याबद्दल कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– कु. वेदिका अशोक दहातोंडे (आध्‍यात्मिक पातळी ५७ टक्‍के, वय १६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक