रत्नागिरी : वाटद सरपंच अंजली विभुते यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव संमत

रत्नागिरी, २६ फेब्रुवारी –  तालुक्यातील वाटद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अंजली विभुते यांच्या विरोधातील अविश्‍वास ठराव एकमताने संमत करण्यात आला.   मतदानाच्या वेळी ठरावाच्या बाजूने १०, तर ठरावाच्या विरुद्ध केवळ १ मत पडल्याने अविश्‍वास ठराव संमत झाला.

वाटद ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अंजली अनंत विभूते यांच्या कारभाराच्या विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून तक्रारी वाढल्या होत्या. याविषयी ग्रामपंचायत सदस्यांनी प्रशासनाकडे तक्रारी प्रविष्ट केल्या होत्या; मात्र तक्रारींवर कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य सरपंच विभुते यांच्या विरोधात एकत्र आले आणि त्यांनी अविश्‍वास ठराव प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तहसीलदार शशिकांत जाधव यांच्याकडे अविश्‍वास ठरावाबाबत लेखी अर्ज करण्यात आला. या अर्जानुसार २४ फेब्रुवारी या दिवशी तहसीलदार शशिकांत जाधव यांनी वाटद ग्रामपंचायतीत उपस्थित राहून अविश्‍वास ठरावावर मतदान प्रक्रिया घेतली.

सरपंचपदाच्या कालावधीत अंजली विभुते यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा फटका येथील स्थानिक व्यापार्‍यांना बसला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीतील सर्वपक्षीय सदस्य विभुते यांच्या विरोधात एकवटले होते.