सातारा नगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक ४०० कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता !

सातारा, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेचा अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३ वाजता समिती सभागृहात सादर होणार आहे. पालिका प्रशासक अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सभेमध्ये सातारा शहराचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक ४०० कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता पालिका सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

१. नगरसेवकांचा कार्यकाळ संपून अद्याप निवडणुका न झाल्यामुळे नवीन सर्वसाधारण सभा अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्पही प्रशासक अभिजित बापट यांच्या वतीने मांडला जाणार आहे.

२. अंदाजपत्रकाच्या अभिप्रायाचे कृती वाचन लेखापाल आरती नांगरे यांच्याकडून केले जाण्याची शक्यता आहे. सातारा नगरपालिकेचा गतवर्षीचा अर्थसंकल्प २१२ कोटी रुपये होता.

३. अंदाजपत्रकीय अर्थसंकल्पाविषयी लेखा विभाग आणि अंतर्गत लेखापरीक्षक यांच्या विभागीय बैठका चालू असून अंदाजपत्रक मांडण्याची सिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे.

४. प्रशासकीय कार्यकाळात यावर्षी दुसरा अर्थसंकल्प सादर होत आहे. विशेष सभेमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्यांच्या तरतुदी मांडल्या जाणार आहेत.

५. शहर आणि सीमावाढ झालेल्या भागांच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कोट्यवधींचा निधी आणला जाणार आहे.

६. या कोट्यवधींच्या निधीची १० टक्के रक्कम लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सुचवण्यात आलेली कामे, तसेच ‘अमृत योजने’अंतर्गत समाविष्ट कामे, नगरोत्थान आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेअंतर्गत संमत होणारी कामे यांमुळे सातारा शहराच्या विकासाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक ४०० कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

७. काही प्रस्ताव संमतीच्या अंतिम टप्प्यात आहेत. कास बंदिस्त पाईपलाईन, सीमावाढ भागातील विकासकामे, अमृत योजना, नगरोत्थान अशा विविध योजनांमधील शहरातील मोठी विकासकामे मार्गी लावण्यात येत आहेत.

त्यामुळे यंदाची अर्थसंकल्पीय सभा विशेष चर्चेची ठरणार आहे.