शिक्षकपदावर नोकरी देण्याचे आमीष दाखवून ४६ जणांची फसवणूक !

शिक्षक भरती प्रकरणामध्ये होणारे घोटाळे टाळण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना हवी !

पुणे – शिक्षकपदावर नोकरी देण्याचे आमीष दाखवून ४६ जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह त्यांच्या भावाच्या विरोधात हडपसर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोपट सूर्यवंशी यांनी यासंदर्भात तक्रार प्रविष्ट केली आहे. दादासाहेब दराडे यांनी ‘त्यांची बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहेत’, असे सांगून तक्रारदारांचा विश्वास संपादन केला, तसेच तक्रारदारांच्या दोन नातेवाईकांनाही शिक्षकपदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांनी प्रत्येकी १२ लाख आणि १५ लाख रुपये घेतले; मात्र शिक्षक म्हणून नोकरी न लावल्याने तक्रारदारांनी पैसे मागितले, तेव्हा आरोपींनी पैसे परत केले नाहीत. प्राथमिक अन्वेषणातून या दोघांसमवेत इतर ४४ जणांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

शैलजा दराडे यांनी ‘दादासाहेब दराडे यांच्याशी काही संबंध नाही. तो माझ्या पदाचा अपलाभ घेऊन लोकांना फसवून नोकरी लावण्याचे आमीष देतो. त्याच्यासमवेत कसलाही व्यवहार करू नये’, अशी सूचना ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती, असे सांगितले. या संदर्भात आयुक्त शैलजा दराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क क्रमांक बंद असल्यामुळे तो होऊ शकला नाही.