पुणे – येथील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ भाजपच्या वतीने ‘रोड शो’ काढण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि सर्व पदाधिकारी यांमध्ये सहभागी झाले होते. मोठा हार, पुष्पवृष्टी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांच्या प्रचार यात्रेला प्रारंभ झाला. राज्यातील सत्तांतरानंतर थेट मतदारांचा कौल आजमावण्यासाठीची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे कोणतीही कसर सोडायची नाही, या निर्धाराने भाजपने प्रचार यंत्रणा आखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे प्रचारात सहभागी झाले आहेत. पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले, चित्रा वाघ यांनी ‘रोड शो’च्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला, तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रचारयंत्रणेवर लक्ष ठेवण्याचे काम केले आहे.