सातारा, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील बाल गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘उंच भरारी योजने’चा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात कौशल्य विकास आणि रोजगार या दोन्ही सूत्रांवर भर देण्यात आला आहे. ही योजना १५ ते २५ वयोगटांसाठी राबवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
उंच भरारी योजने अंतर्गत पहिला टप्पा कौशल्य विकास व रोजगार अंतर्गत कोरेगांव, दहिवडी, पाटण, कराड, फलटण उपविभागातुन एकुण ३२३ युवक व युवती व त्यांचे पालक यांचेशी सकारात्मकरित्या चर्चा व नाव नोंदणी करण्यात आलेली आहे.
.@CMOMaharashtra @maharashtra_hmo @DGPMaharashtra #उंचभरारी pic.twitter.com/jWwjmb6eV0— सातारा पोलीस-Satara Police (@SataraPolice) February 22, 2023
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, १६ फेब्रुवारी या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव विभागातील कोरेगाव, पुसेगाव आणि वाठार या पोलीस ठाण्यांच्या सीमेतील विधी संघर्ष बालक आणि युवक यांना (१८ वर्षांखालील गुन्हेगार मुले) ‘आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थे’च्या संचालकांनी स्वयंरोजगाराविषयी माहिती देऊन अर्ज भरून घेतले आहेत. तसेच ‘मेधावी स्कील युनिव्हर्सिटी’द्वारे त्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी ७० युवक-युवती त्यांच्या पालकांसह उपस्थित होते. १७ फेब्रुवारी या दिवशी पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांच्या अध्यक्षतेखाली वडूज विभागातील वडूज, दहिवडी, औंध आणि म्हसवड या पोलीस ठाण्यांच्या सीमेतील ६९ विधी संघर्ष बालक, तसेच युवक-युवती यांचे अर्ज भरून घेण्यात आले. या वेळी स्वयंरोजगाराविषयी माहिती देऊन त्यांच्या आवडीनुसार कौशल्य विकास स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले. ‘उंच भरारी योजने’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात १४९ विधी संघर्ष बालक, युवक आणि युवती यांना सामावून घेण्यात आले आहे. कौशल्य विकास योजने अंतर्गत त्यांना रोजगारही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही योजना जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, पाटण आणि फलटण या सर्व उपविभागांमध्ये राबवण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे कौतुकसातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अत्यंत थोड्या कालावधीत समाजोपयोगी उपक्रमांना प्रारंभ केल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ‘गड-कोट स्वच्छता मोहीम’ हा अत्यंत प्रभावी उपक्रम ठरला आहे. |