तिसरे महायुद्ध झाल्यास जग ३ गटांत विभागले जाईल !

भारत असेल तिसर्‍या गटात !

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशिया-युक्रेन युद्ध एक वर्षानंतरही अद्याप चालूच असल्याने जग तिसर्‍या महायुद्धाकडे वेगाने सरकत असल्याचे मत अनेक संरक्षण तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. असे झाल्यास इच्छा असो वा नसो, अनेक देश या महायुद्धाच्या खाईत लोटले जातील.

अमेरिकेच्या ‘फेडरल इंटेलिजन्स सर्व्हिस’चे माजी उपाध्यक्ष तथा संरक्षणतज्ञ रूडॉल्फ जी.एम्. यांनी ‘तिसरे महायुद्ध चालू झाल्यास जग तीन गटांमध्ये विभागले जाईल’, असे म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, त्यात अमेरिका आणि रशिया समोरासमोर उभे ठाकतील. काही देश अमेरिकेला साथ देतील, तर काही देश रशियाच्या बाजूने उभे रहातील. या युद्धात तिसरा गट त्या देशांचा असेल, ज्यांचे वरील दोन्ही गटांतील देशांशी काही ना काही हितसंबंध असतील; परंतु त्यांना युद्ध नको असेल. तरीही अनिच्छेने त्यांच्यावरही युद्ध लादले जाईल.

१. यातील पहिल्या गटात पाश्चिमात्य उदारमतवादी आणि भांडवलशाही देश एका बाजूला असतील. यामध्ये अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीयन देशांचा समावेश असेल. दक्षिण कोरियाही याच गटात जाईल; कारण त्यांना अमेरिकेने वेळोवेळी साहाय्य केले आहे.

२. दुसर्‍या गटामध्ये रशिया असेल. या बाजूला बेलारूस, इराण, सिरिया, व्हेनेझुएला आणि उत्तर कोरिया हे देश असतील. चीन याच गटात रहाण्याची शक्यता आहे. त्यामागे ‘अमेरिकेऐवजी स्वत:ला महाशक्ती म्हणून समोर आणण्याचा चीनचा प्रयत्न’, हे कारण असेल. तसेच ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या म्हणीप्रमाणे चीन मुत्सद्देगिरीच्या चाली खेळू शकतो.

३. तिसर्‍या गटात विकसनशील देशांचा समावेश असेल. विकसित देशांसाठी आव्हान म्हणून पुढे आलेला या गटाचे नेतृत्व करू शकतो. यात भारतासह इतर आशियाई देश असतील. दक्षिण अमेरिका आणि अरब देश हेसुद्धा या गटात असू शकतात. युद्ध थांबवण्याचा त्यांच्या प्रयत्न असेल.