राजस्थानमधील भाजपच्या माजी आमदाराला २० वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या प्रकरणी १० वर्षांचा कारावास

नागौर (राजस्थान) – येथील जिल्हा न्यायालयाने भाजपचे माजी आमदार भंवरलाल राजपुरोहित (वय ८६ वर्षे) यांना २० वर्षांपूर्वीच्या बलात्काराच्या प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाची रक्कम बलात्कार पीडितेला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजपुरोहित या वेळी न्यायालयात व्हिलचेअरवर बसून उपस्थित होते. न्यायालयाने निकाल सुनावताच पोलिसांनी राजपुरोहित यांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली.

१. मनाना गावात रहाणारी एक २२ वर्षीय महिला २९ एप्रिल २००२ या दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भंवरलाल राजपुरोहित यांच्या विहिरीवर गेली होती. त्या दिवशी भंवरलाल यांची पत्नी घरी नव्हती. ‘भंवरलाल यांनी स्वतःच्या घरात बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला’, असा आरोप पीडितेने केला होता. त्यानंतर पीडितेने न्यायालयात या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यावरून न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता. अत्याचार केल्यानंतर पीडिता गर्भवती राहिली होती. ज्यामुळे तिचा गर्भपात करावा लागला होता.

२. या प्रकरणाच्या दीड वर्षानंतर भंवरलाल आमदार झाले. त्यामुळे प्रकरणाची चौकशी थंड पडली होती. विरोधकांनी प्रकरण लावून धरल्यानंतर न्यायालयात खटला चालू होता.

संपादकीय भूमिका 

एका गुन्ह्यावर निकाल देण्यास २० वर्षे लागत असतील, तर तो न्याय म्हणायचा का ?