लहान देशांत पैशाला विशेष महत्त्व नसल्याने ते समाधानी ! – वैज्ञानिक क्रिस्तोफर बॉयसे

२५ देशांत प्रवास करून स्कॉटलंड येथील वैज्ञानिक क्रिस्तोफर बॉयसे यांनी काढला निष्कर्ष !

वैज्ञानिक क्रिस्तोफर बॉयसे

एडिनबर्ग (स्कॉटलंड) – मानवी वर्तणुकीवर अध्ययन करणारे येथील वैज्ञानिक क्रिस्तोफर बॉयसे यांनी ‘माणसाला कोणत्या गोष्टीमुळे शाश्‍वत आनंद होतो ?’, या प्रश्‍नाच्या शोधप्रीत्यर्थ सायकलवरून २५ देशांतून तब्बल २० सहस्र किलोमीटरचा प्रवास केला. यासाठी त्यांनी त्यांची नोकारीही सोडली. या प्रवासात ते मुख्यत्वे भारताच्या शेजारील देश भूतान येथे राहिले. त्यांना लक्षात आले की, लहान देश ‘जीवनात समाधान मिळण्यासाठी पैसा विशेष महत्त्वाचा नाही’, असे शिकवतात.

स्कॉटलंडमधून बॉयसे यांचा प्रवास चालू झाला. या कालावधीत ते शेकडो लोकांना भेटले. त्यांच्यासमवेत राहिले. ‘विविध देशांच्या जगण्याच्या पद्धतींमध्ये आनंदाचे कारण लपलेले आहे’, हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांचा अभ्यास मांडला.

१. मध्य अमेरिकी देश कोस्टा रिका या इवल्याशा देशात बॉयसे पोचल्यावर त्यांना लक्षात आले की, त्या देशाचे स्वत:चे सैन्य नाही. बॉयसे म्हणाले, ‘प्यूरा विडा’ म्हणजे सामान्य जीवनशैली ! येथील लोकांचे सरासरी वय ७९.१ वर्षे आहे. देशात सैन्य नसल्याने बहुतांश खर्च शिक्षण आणि आरोग्य यांवर होतो.

२. दक्षिण अमेरिकी देश पेरूसंदर्भात बॉयसे म्हणाले, येथील लोक गरीब असो कि श्रीमंत, ते आनंदी आहेत. येथे संयुक्त कुटुंबपद्धत आहे. सर्व एकत्र कामही करतात. लोकांमध्ये परस्पर जिव्हाळा आहे. याखेरीज त्यांच्यात धैर्य दिसते.

३. कॅनडासारख्या प्रगत देशात सायकलने फिरतांना बॉयसे यांना लक्षात आले की, येथे वर्ष २००० पासून ‘कॅनेडियन इंडेक्स ऑफ वेल बिईंग’ (जनतेच्या कल्याणासाठी घालण्यात आलेली पद्धत) चालू करण्यात आले. यांतर्गत विकासाचे मापदंड ठरवण्यात आले असून यामध्ये सामाजिक जीवन, लोकशाहीवर विश्‍वास, शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आदींचा समावेश आहे.

क्रिस्तोफर बॉयसे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवांचा व्हिडिओ पहाण्यासाठी पुढील मार्गिकेला भेट द्या – https://www.youtube.com/watch?v=ZlIm9_P4Uwg

भूतानने ‘जनतेच्या आनंदा’ला विकासाचा निकष ठरवण्याचा मंत्र जगाला दिला ! – बॉयसे

वैज्ञानिक बॉयसे हे शेवटी भूतानमध्ये पोचले. या देशात विकासाचे मापदंड ‘जीडीपी’ म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) नसून ‘जी.एन्.एच्. म्हणजेच ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस म्हणजे आनंदाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. बॉयसे म्हणतात, भूतानने जनतेच्या आनंदाला विकासाचा निकष ठरवण्याचा मंत्र जगाला दिला आहे. येथील लोकांचा संस्कृतीचे संरक्षण करणे, समुदायासमवेत जगणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे यांवर विश्‍वास आहे. त्यामुळे लोक आनंदी आणि समाधानी राहतात.

संपादकीय भूमिका 

जगाला शाश्‍वत आनंदाचा मार्ग हा हिंदु धर्माने दिला आहे; परंतु भारतातील हिंदू यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे आज केवळ व्यावहारिक यशाच्या मागे धावत आहेत आणि दु:खी होत आहेत. या सर्वांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन साधना करणे, हे लक्षात घ्या !