गोवा येथील आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र बंद

पणजी, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा देणार्‍या आग्वाद किल्ला (गडाच्या) संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.

गोवा मुक्तीलढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना आग्वाद किल्ल्यात कारावासाची शिक्षा झालेली आहे, तर शिक्षा भोगतांना अनेकांचे प्राणही गेले आहेत. अशा ऐतिहासिक किल्ल्याचे गोवा सरकारने संग्रहालयात रूपांतर केले आहे. या संग्रहालयात फिरते मद्यविक्री केंद्र उघडल्याचे वृत्त समोर आल्यावर या विरोधात स्वातंत्र्यसैनिक संघटना, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून रोष व्यक्त केला गेला. मद्यविक्री केंद्र उघडल्याने स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान होत असल्याने मद्यविक्री केंद्राच्या विरोधात आंदोलन छेडण्याची चेतावणी स्वातंत्र्यसैनिक संघटनेने दिली होती.

 (सौजन्य : Prudent Media Goa) 

या पार्श्वभूमीवर  सरकारने हे मद्यविक्री केंद्र बंद केले आहे. तत्पूर्वी २१ फेब्रुवारी या दिवशी सकाळी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना उपस्थित पत्रकारांनी संग्रहालयातील मद्यविक्री केंद्राविषयी प्रश्न केला असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘मी पहातो’, असे उत्तर दिले होते.

संपादकीय भूमिका

मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !