सातारा, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारसा साडेतीन शतकांनंतरही अनुकरणीय आहे. हा वारसा नव्या पिढीने स्वीकारायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे बोट धरूनच मी पुढे जात आहे, असे उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.
नवीन बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या मुख्य दालनामध्ये शिवप्रभूंची पूर्णाकृती मूर्ती आणि तख्त (दरबारात विशिष्ट उंचीवर बसायची जागा) शिवजयंतीनिमित्त समस्त सातारावासियांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. खासदार श्रीमंत्र छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या तख्ताचे खाली वाकून दर्शन घेतले. तसेच शिवप्रभूंच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. या वेळी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे, नगरसेवक सुहास राजेशिर्के उपस्थित होते.
खासदार भोसले पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व युगांमध्ये आदरणीय आहेत. त्यांनी सार्वभौमत्व आणि समता यांचे दिलेले विचार आजही मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय लवकरच योग्य सुविधांसह समस्त शिवभक्तांसाठी खुले होईल.