परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगातून साधिकेने उलगडलेले त्‍यांचे दैवी गुणमोती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण्‍याची पद्धत शब्‍दांत व्‍यक्‍त करणे अशक्‍य आहे. परात्‍पर गुरुदेव माझे सर्वकाही आहेत. ते माझे अस्‍तित्‍व आहेत. ते माझ्‍या आयुष्‍यात नसते, तर माझ्‍या आयुष्‍याला काहीच अर्थ नसता; कारण ते आहेत; म्‍हणून सर्वकाही शक्‍य आहे. माझ्‍यासारख्‍या तुच्‍छ जिवाला त्‍यांनी जसे घडवले आहे, त्‍या साक्षात् विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींची शिकवण शब्‍दांत वर्णन करणे अशक्‍य आहे. ‘विष्‍णुस्‍वरूप गुरुमाऊलींची शिकवण शब्‍दांत वर्णन करण्‍यासाठी मला मार्गदर्शन कर’, अशी मी भगवान शिवाच्‍या चरणी प्रार्थना करते. १२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘परात्‍पर गुरु डॉॅ. आठवले यांचे निरपेक्ष प्रेम (प्रीती)’ याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.   

लेखाचा भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/653533.html

(भाग २)

२. कर्तेपणा स्‍वतःकडे न घेता तो देवाला अर्पण करणे

सौ. श्‍वेता क्‍लार्क

‘परात्‍पर गुरुदेवांच्‍या केवळ अस्‍तित्‍वाने सकारात्‍मक पालट घडत असतात. असे असूनही परात्‍पर गुरुदेव सदैव विनम्र असतात. ते स्‍वतःकडे कधीच कशाचे श्रेय घेत नाहीत. ‘ते स्‍वतः अजूनही शिष्‍यभावात असतात’, हे अनेक उदाहरणांतून त्‍यांनी आम्‍हाला शिकवले आहे. आम्‍ही काही साधक एकदा त्‍यांच्‍या खोलीत सूक्ष्मातील प्रयोग करत होतो. आश्रमापासून बर्‍याच अंतरावर एक डोंगर आहे. त्‍या डोंगराच्‍या दिशेने परात्‍पर गुरुदेव स्‍वतःचा हात हलवत होते. तेव्‍हा त्‍या डोंगराभोवती असलेला काळोख दूर होऊन तेथे पुसटसा पांढरा प्रकाश दिसत होता. त्‍या वेळी परात्‍पर गुरुदेव म्‍हणाले, ‘‘संतांमध्‍ये सकारात्‍मक शक्‍ती असते आणि ती त्‍यांच्‍या हातांच्‍या बोटांतून प्रक्षेपित होत असून कित्‍येक कि.मी. अंतरापर्यंत; अगदी दुसर्‍या लोकांतही पोचू शकते. जसा सूर्य सर्व विश्‍वाला ऊर्जा देतो, त्‍याप्रमाणे हे आहे. माझ्‍यासारख्‍या लहान व्‍यक्‍तीकडून काही प्रमाणात सकारात्‍मक शक्‍ती प्रक्षेपित होत असेल, तर ‘ईश्‍वराकडून किती प्रमाणात सकारात्‍मक शक्‍ती प्रक्षेपित होत असेल !’, याची कल्‍पनाच करता येणार नाही.’’ परात्‍पर गुरुदेवांचे ते वाक्‍य ऐकून तेथे असलेल्‍या आम्‍हा सर्वच साधकांची भावजागृती झाली. यातून त्‍यांनी आम्‍हाला ‘नेहमी विनम्र कसे रहायचे ?’, हे शिकवले. भगवंत आपल्‍यासाठी जे काही करतो, त्‍या तुलनेत आपण काहीच करत नाही. परात्‍पर गुरुदेव म्‍हणतात, ‘‘ज्‍या क्षणी आपल्‍याला ‘मी केले’, असे वाटते, त्‍या क्षणापासून साधनेत आपली अधोगती चालू होते.’’

३. साधिकेच्‍या आईच्‍या संदर्भातील प्रसंग तिला असणार्‍या वाईट शक्‍तींच्‍या त्रासामुळे घडत असल्‍याचे परात्‍पर गुरुदेवांनी सांगणे आणि त्‍या वेळी साधनेतील मोठा अडथळा दूर झाल्‍याचे साधिकेला जाणवणे

मी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी येत असतांना माझ्‍या आईच्‍या संदर्भात काही प्रसंग झाले. त्‍या वेळी ‘माझे नेमके काय चुकले ?’, ‘मी एकटी का आहे ?’, असे विचार येऊन मला वाईट वाटत होते. याविषयी मी परात्‍पर गुरुदेवांना काहीही सांगितले नसतांना त्‍यांनी एका साधकाकडून निरोप पाठवला. त्‍यांनी कळवले, ‘‘तुझ्‍या आईला वाईट शक्‍तींचा त्रास आहे. ती वाईट शक्‍ती तुझ्‍यावर आक्रमण करण्‍याचा प्रयत्न करत आहे. त्‍यामुळे तुला त्रास होत आहे. हे जेव्‍हा तुझ्‍या लक्षात येईल, तेव्‍हा तू तुझ्‍या आईला दोष देणार नाहीस. काळजी करू नकोस.’’ मी काहीही न सांगता माझ्‍या मनातील विचार त्‍यांना कळलेले पाहून मला पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले. त्‍या साधकाचे बोलणे पूर्ण होताक्षणी ‘शक्‍तीचा एक मोठा प्रवाह माझ्‍याकडे आला असून माझ्‍यावरचे कसले तरी ओझे न्‍यून झाले’, असे मला जाणवले. साधनेतील हा अडथळा स्‍वबळावर दूर करणे माझ्‍यासाठी अशक्‍य होते. आईविषयीचे कठीण प्रसंग कितीतरी वर्षे माझ्‍या मनात राहून माझा संघर्ष झाला असता. गुरु आपल्‍या जीवनात आल्‍यावर असे पालट घडतात की, त्‍यांच्‍या संकल्‍पाने आणि चैतन्‍याने आपल्‍या साधनेतील अडथळे दूर होतात आणि ते आपल्‍याला साधना करण्‍यासाठी मार्ग मोकळा करून देतात.

४. ‘भाव म्‍हणजे काय ?’, हे अन्‍य साधकांच्‍या प्रयत्नांतून शिकवणे

‘भाव म्‍हणजे काय ?’, याची तात्त्विक माहिती ठाऊक आहे; परंतु परात्‍पर गुरुदेवांनी साधकांना स्‍वतःच्‍या कृतीतून ‘भाव म्‍हणजे काय ?’, हे शिकवले आहे. परात्‍पर गुरुदेव स्‍वतःचे छायाचित्र ठेवण्‍यास न सांगता त्‍यांचे गुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवण्‍यास सांगतात. ते पूर्वीपासून सांगतात, ‘‘माझे गुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या कृपेमुळेच मी शेकडो ग्रंथ लिहू शकलो. त्‍यांच्‍या कृपेमुळेच ‘ईश्‍वरी राज्‍याच्‍या (हिंदु राष्‍ट्राच्‍या) स्‍थापनेचे कार्य गतीमान होत आहे.’’ परात्‍पर गुरुदेव नेहमीच शिष्‍यभावात असतात. एखाद्या साधकामध्‍ये विशिष्‍ट गुण अथवा भाव असल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले, तर तो गुण ते अशा पद्धतीने बाहेर आणतात की, त्‍यातून सर्वांनाच शिकता येईल. साधकाच्‍या मनाची स्‍थिती आणि त्‍याच्‍यात असलेला भाव परात्‍पर गुरुदेवच जाणतात. त्‍यांच्‍यामुळेच आम्‍हाला ‘भाव म्‍हणजे काय?’, ‘ईश्‍वराप्रतीचा भाव कसा अनुभवायचा?’, हे शिकता आले; अन्‍यथा आमच्‍या जीवनात कोरडेपणा आला असता.

५. ‘इतरांच्‍या प्रगतीचा विचार केल्‍यास साधनेत खरी प्रगती होते’, असे परात्‍पर गुरुदेवांनी सांगणे

परात्‍पर गुरुदेवांनी साधनेच्‍या विविध मार्गांतून, म्‍हणजे ज्ञानयोग, कर्मयोग, हठयोग आणि भक्‍तीयोग यांतून आवश्‍यक सूत्रे घेतली अन् साधकांना त्‍यांच्‍या साधनेसाठी आवश्‍यक असलेल्‍या त्‍या सूत्रांची शिकवण दिली. आम्‍ही (साधक) आमच्‍याच प्रगतीचा विचार करत असतो; मात्र परात्‍पर गुरुदेव म्‍हणतात, ‘‘इतरांच्‍या प्रगतीचा विचार केल्‍यास, इतरांना प्रेम दिल्‍यास, स्‍वतःमध्‍ये भाव निर्माण होण्‍यासाठी प्रयत्न केल्‍यास, तसेच स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्‍यासाठी प्रयत्न केल्‍यास खर्‍या अर्थाने आपली अध्‍यात्‍मात प्रगती होते.’’

६. परात्‍पर गुरुदेवांनी साधकांना आध्‍यात्मिक घटनांचा सूक्ष्मातून अभ्‍यास करण्‍यास शिकवणे

समाजात खोटे अध्‍यात्‍म शिकवणारे असतात. परात्‍पर गुरुदेवांनी मात्र समाजाला खरे अध्‍यात्‍म शिकवले. त्‍यांनी साधकांना अध्‍यात्‍मातील विविध पैलूंचा आणि आध्‍यात्मिक घटनांचा अभ्‍यास करायला शिकवले. ‘देहावर दैवी कण दिसणे, ‘ॐ’ उमटणे’, असे दैवी पालट होण्‍यास त्‍यांच्‍यापासूनच आरंभ झाला. ‘वाईट शक्‍तींचे तोंडवळे उमटणे, दैवी नाद ऐकू येणे’ इत्‍यादी आध्‍यात्मिक घटनाही ते रहात असलेल्‍या खोलीत घडल्‍या. या दैवी तत्त्वांविषयी त्‍यांनी आमच्‍यात जागरूकता निर्माण केली. सतत सूक्ष्मातील प्रयोग करून ‘सूक्ष्मातील कसे जाणून घ्‍यायचे ?’, हे त्‍यांनी आम्‍हाला शिकवले. ‘खरेतर ती क्षमता आमच्‍यात (साधकांत) नाही’, हे सर्वांनाच ठाऊक आहे. परात्‍पर गुरुदेवांनी आम्‍हाला चैतन्‍य आणि शक्‍ती दिल्‍यामुळे दैवी अनुभूती घेणे शक्‍य झाले. परात्‍पर गुरुदेवांमध्‍ये पुष्‍कळ जिज्ञासा आहे आणि कोणत्‍याही गोष्‍टीकडे; मग ती चांगली असो वाईट, ते अभ्‍यासाच्‍या दृष्‍टीकोनातूनच पहातात. सूक्ष्मातील सर्व उत्तरे त्‍यांना ठाऊक असतात; मात्र साधकांच्‍या माध्‍यमातून ते अभ्‍यास करून घेतात आणि नंतर त्‍यांच्‍या माध्‍यमातून उत्तरे सांगतात.

७. परात्‍पर गुरुदेवांनी साधकांमध्‍ये ‘साधना केल्‍यास ईश्‍वर काळजी घेतो’, अशी श्रद्धा निर्माण करणे

परात्‍पर गुरुदेवांनी स्‍वतः कठोर साधना करून जगभरातील साधकांसाठी साधनेचा मार्ग सुलभ करून दिला आहे. त्‍यांनी साधकांसाठी घेतलेल्‍या अपार कष्‍टांचेच हे फळ आहे. त्‍याचा लाभ आम्‍ही साधक अनुभवत आहोत. ‘आम्‍ही साधना करण्‍यासाठी त्‍याग केला आहे. आम्‍ही पूर्णवेळ साधना करतो’, असे आम्‍हाला (साधकांना) वाटते. किती निरर्थक (व्‍यर्थ) विचार आहे हा ! कुणाच्‍या बळावर आम्‍ही सर्व सोडून येऊ शकतो ? परात्‍पर गुरुदेवांनी आमचा हात धरला असून आम्‍हाला पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी आश्रम उपलब्‍ध करून दिले. परात्‍पर गुरुदेवांनी तर मुंबईत एकट्याने केवळ एका खोलीपासून अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या सेवेला आरंभ केला. त्‍यांनी साधकांना जे दिले आहे, त्‍यासाठी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे. त्‍यांचे स्‍वतःचे उदाहरण आम्‍हा साधकांना निश्‍चिंत बनवते आणि ‘जेव्‍हा आपण साधना करतो, तेव्‍हा ईश्‍वर आपली काळजी घेतो’, अशी श्रद्धा निर्माण करते.

८. परात्‍पर गुरुदेवांनी साधिकेच्‍या आईला मन अर्पण करण्‍यास सांगणे आणि त्‍या क्षणापासून मन अर्पण होण्‍यास आरंभ झाल्‍याचे तिने अनुभवणे

काही वर्षांपूर्वी मी माझ्‍या आईच्‍या समवेत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आले होते. त्‍या वेळी माझी साधना फारशी चांगली होत नव्‍हती. जेव्‍हा आम्‍ही परात्‍पर गुरुदेवांना भेटलो, तेव्‍हा माझी आई त्‍यांना म्‍हणाली, ‘‘तुम्‍ही संपूर्ण ब्रह्मांडाचे नायक आहात. आम्‍ही क्षुद्र जीव आहोत. आम्‍ही तुम्‍हाला काय अर्पण करू शकतो ? तुम्‍हाला अर्पण करण्‍यासारखे आमच्‍याकडे काहीच नाही.’’ यावर परात्‍पर गुरुदेव म्‍हणाले, ‘‘तुमचे मन अर्पण करा !’’ त्‍यानंतर परात्‍पर गुरुदेवांनी त्‍यांचे हात आमच्‍यासमोर धरले. त्‍यांच्‍या हातांच्‍या प्रत्‍येक बोटातून दैवी गंध येत होता. ‘या माध्‍यमातून ते माझ्‍या आणि आईच्‍या भोवती असलेले त्रासदायक शक्‍तीचे आवरण दूर करून आम्‍हाला चैतन्‍य प्रदान करत आहेत’, असे आम्‍हाला जाणवले. त्‍या क्षणापासून आमचे मन अर्पण होण्‍यास आरंभ झाला.

‘परात्‍पर गुरुदेव, ‘या क्षुद्र जिवाला सदैव आपल्‍या कमलचरणांशी ठेवा’, हीच प्रार्थना !’                  (समाप्‍त)

– सौ. श्‍वेता शॉन क्‍लार्क, फोंडा, गोवा. (४.१.२०१९)    ॐ

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.