१. साधनेने मनाच्या स्थितीवर केलेली मात
१ अ. ‘जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी श्रीकृष्णच आधार आहे’, असे वाटून त्याला मनाची स्थिती सांगणे : ‘सर्वप्रथम देवाने माझ्या मनामध्ये त्याच्या प्रीतीची ओढ निर्माण केली. जेव्हा माझे मन दुःखी असायचे आणि ‘माझ्या समवेत कुणी नाही ?’, असे मला वाटायचे, तेव्हा मी कृष्ण अन् गुरुदेव यांच्या छायाचित्रांजवळ मनमोकळेपणे बोलायचे. त्यामुळे ‘कृष्णच माझा एकमेव आधार आहे’, याची जाणीव वाढली. त्यानंतर देवाने मला सर्व विचारांच्या जाळ्यांतून बाहेर काढले.
१ आ. देवाचा धावा करून सकारात्मकता वाढवल्याने अभियांत्रिकी परीक्षेत उत्तीर्ण होणे : मी देवाचा धावा करून स्वतःमध्ये सकारात्मकता वाढवली. मी परात्पर गुरुदेव, श्रीकृष्ण आणि गणपति यांना शरण गेले. त्यांना आत्मनिवेदन स्वरूप प्रार्थना केल्याने त्यांनीच माझा अभ्यास करवून घेतला. ‘मला जमेल का ? येईल का ?’, असा विचार न करता जे करायचे आहे, त्याकडे लक्ष देऊन मी देवाचा धावा वाढवून परीक्षा दिली. त्यामुळे देवाने मला अभियांत्रिकी परीक्षेत उत्तीर्ण केले.
२. सेवा करतांना झालेली मनाची प्रक्रिया आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यावर विचारांत झालेले पालट
२ अ. सेवा करतांना लक्षात आलेले स्वभावदोष आणि अहंचे पैलू
१. मी साधकांच्या संपर्कात आल्यावर साधकांनी माझ्या गुणांचे कौतुक केल्यावर ‘तसे गुण माझ्यात आहेत’, असे मला वाटायचे. त्यामुळे माझ्यातील सूक्ष्म अहं वाढत होता.
२. ‘ज्याप्रमाणे इतर साधक ध्येय गाठत आहेत, त्याप्रमाणे आपणही गाठू’, असा भ्रम माझ्या मनामधे वाढला होता. नंतर मला वाटू लागले, ‘माझ्यात एवढे गुण आहेत, तरीही अजून आपण अपेक्षित ध्येय का गाठू शकत नाही ?’
३. मी सेवेत येण्यापूर्वी मला मायेतील गोष्टींविषयी बहिर्मुखता होती. त्यानंतर माझी साधनेतील बहिर्मुखता वाढली. माझ्या मनात ‘कोण आपले कौतुक करते ? कोण आपल्याबद्दल काही बोलले ?’, असे विचार चालू रहायचे. तेव्हा मला वाटायचे की, मी साधनेचाच विचार करत आहे.
४. ‘मला अधिक कळते’ या विचाराने मी स्वतःच्या स्तरावर व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करत होते. ‘माझा सेवेचा कालावधी अधिक आहे’, असे मला वाटायचे.
५. ‘मी माझ्या उत्तरदायी साधकांनी सांगितल्याप्रमाणे करत आहे आणि त्यामुळे माझ्याकडून चूक होणार नाही’, असे मला वाटत होते, तरीही माझ्याकडून चुका होऊ लागल्या. त्यामुळे मला वाईट वाटू लागले. तसेच कुणीतरी सांगते; म्हणून केल्याने माझ्यात सेवाभाव अल्प होता, तसेच अल्प वेळेत सेवा पूर्ण करून घरी जाण्याची ओढ असायची.
६. माझ्यातील आवड-नावड जागृत असल्याने ‘मला जी सेवा मिळाली, तिच्या व्यतिरिक्त अन्य कोणती सेवा देऊ नये’, असा माझा विचार असायचा. मला संगणकीय सेवेव्यतिरिक्त प्रसारातील सेवांचा ताण यायचा. प्रसार म्हणजे प्रत्यक्ष समाजाशी संपर्क येणे, त्यांना साधनेविषयी सांगणे, हे माझ्याकडून टाळले जायचे.
२ आ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्यावर विचारांत झालेले पालट !
१. माझ्यातील ‘कर्तेपणा आणि कौतुकाची अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूंमुळे माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत होते.
२. ‘मनाने करणे’ यापेक्षा मी सर्वकाही विचारून केले पाहिजे. त्यामुळे ‘अहं जाऊन माझ्यात नम्रता येणार आहे’, हे पुढे लक्षात येऊ लागले.
३. पुढे मी ‘सेवा किती वेळ करते ?’, यापेक्षा सेवा परिपूर्ण करायला हवी, हे लक्षात आले.
४. आपल्याला गुरुसेवेमुळे गुरुकृपा होऊन आपले जे ध्येय आहे, त्याची प्राप्ती होणार आहे. ‘सेवा करून गुरुदेवांच्या चरणांशी जायचे आहे’, असा भाव निर्माण झाला.
५. मला कोणतीही सेवा सांगितल्यावर मी ती सेवा स्वीकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सेवेची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. सेवेचेच विचार अधिक असल्याने माझे ‘घरी जाण्याचे विचार’ अल्प झाले. साधकांचा सत्संगही मिळत गेला.
६. काही दिवसांनी मी युवासाधक गटात आढावा देण्यासाठी जोडले गेले. काही वर्षांनी मला ‘युवा साधक आढावा सेवक’ म्हणून दायित्व देऊन आढावा घेण्याची सेवा मिळाली. मी साधकांमध्ये मिसळणे आणि मनमोकळेपणाने बोलणे टाळत असे; परंतु गुरुदेवांनी प्रसंग घडवून अपेक्षित कृती करून घेतली.
३. गुरुदेवांनी वेगवेगळे प्रसंग घडवून साधनेचे प्रयत्न करवून घेणे
अ. मी वेगवेगळी प्रकृती आणि भाव असलेल्या सहसाधकांना साहाय्य केले. या सर्व प्रक्रियेतून माझ्यात व्यापकता वाढली आणि मला आनंद मिळू लागला.
आ. स्वेच्छेपेक्षा ईश्वरेच्छा महत्त्वाची असणे, तसेच प्रतिमा जपण्यापेक्षा गुरुसेवा परिपूर्ण करणे महत्त्वाचे आहे, हे मला देवाने शिकवले.
इ. ‘सहसाधक आणि युवासाधक म्हणजे गुरुरूपच आहेत, तेच या सेवेतून आपल्याला घडवत आहेत’, असे वाटू लागले.
४. भावाच्या स्तरावर देवाने करवून घेतलेले प्रयत्न
अ. सर्वत्र गुरुरूप आणि गुरुतत्त्व पाहून जे आहे ते स्वीकारले. ‘गुरुतत्त्व काय शिकवत आहे ?’, याकडे पाहिले.
आ. ध्रुव बाळाने देवावर विश्वास ठेवून आणि सकारात्मक राहून देवाचे मन जिंकले. ‘तसा भाव स्वतःमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे’, असे देव मला सांगत होता. ‘मी ध्रुव बाळ आहे आणि मी लहान होऊन त्याच्यासारखे प्रयत्न करावेत’, अशी जाणीव निर्माण झाली.
इ. शरणागती आिण गुरुस्मरण यामुळे चित्त शांत होऊ लागले.
५. साधनेच्या प्रक्रियेतून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. ‘साधना करतांना मला ध्येयप्राप्ती लवकर व्हावी’, अशी माझी अपेक्षा होती; पण माझी प्रगती होत नव्हती; म्हणून माझ्यातील नकारात्मकता वाढत होती. माझी स्थुलातून प्रगती होण्यापेक्षा देव माझ्या साधनेतील अडथळे घालवत होता. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून माझ्या विचारांमध्ये पालट करत होता. संघर्षमय प्रसंगांतून मी देवाला अनुभवले.
आ. आपल्या समवेत आंतरिक स्थिती चिरंतन असते. ‘आतून मनातून सूक्ष्मस्तरावर विचारांमधे पालट घडत जातो, भावस्थिती चांगली अनुभवता येत असते’, असे जे पालट होतात, ते म्हणजे ‘सूक्ष्मातील प्रगती’ असे आपण म्हणू शकतो. याच प्रगतीतील आनंद कृतज्ञताभावाने अनुभवणे हीच खरी प्रगती, हे लक्षात आले.
‘हे माऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करून आणखी स्वभावदोष आणि अहंचे अडथळे दूर करण्यासाठी शरणागतीने अन् तळमळीने पुढील प्रयत्न करवून घ्या. मला बळ द्या. मला तुम्हाला अखंड अनुभवता येऊ द्या’, हीच प्रार्थना.’
– कु. वैष्णवी उमाकांत दसाडे, सोलापूर (१७.४.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |