सनातन पंचांगासाठी विज्ञापन मिळवण्यासाठी अधिकोषात जातांना साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !

१. वाहनचालकाची सुटी असल्याने स्वतःच चारचाकी गाडी चालवून सनातन पंचांगासाठी विज्ञापन मिळवण्यासाठी जाण्याचे ठरवणे, इमारतीच्या वाहनतळात गाडी ठेवण्याच्या संदर्भात मनात अनेक विचार येणे आणि काही वेळाने अकस्मात् नामजप चालू होऊन मन स्थिर होणे

श्री. बालाजी कोल्ला

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही (मी आणि सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन्) सनातन पंचांगासाठी विज्ञापन मिळवण्याच्या सेवेनिमित्त चेन्नई येथील ‘माऊंट रोड’वर असलेल्या कॅनरा बँकेत जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार आमचे दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता निघायचे ठरले. (पू. प्रभाकरन्मामा त्यांच्या दुचाकीवरून आले.) त्या दिवशी पूर्वकल्पना न देता माझा वाहनचालक सुटीवर गेल्याने मी स्वतःच चारचाकी गाडी चालवायचे ठरवले. कॅनरा बँकेची इमारत अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी असून तेथे नोकरी करणार्‍या लोकांनाच वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध आहे. अन्य लोकांची वाहने ठेवण्यासाठी तेथे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे ‘गाडी कुठे आणि कशी उभी करायची ? मुख्य रस्त्यावर गाडी ठेवणे नियमबाह्य असल्याने ‘ट्रॅफिक’ पोलीस गाडी घेऊन जाऊ शकतात’, या विचारांच्या गोंधळातच मी गाडी चालवत होतो. एकाएकी माझे सर्व विचार थांबले आणि माझा नामजप चालू झाला. माझे मन स्थिर झाले. माझ्या मनात ‘चारचाकी गाडी थेट अधिकोषाच्या वाहनतळात उभी करूया’, असा विचार आला.

२. अधिकोषाच्या आवारात प्रवेश केल्यावर सुरक्षारक्षकाने अभिवादन करणे, गाडी वाहनतळात ठेवण्यास साहाय्य करणे आणि त्याने साधकाला ‘काम करून या’, असे सांगणे

आम्ही अधिकोषाच्या आवारात प्रवेश करताच तेथे उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाने अभिवादन करत माझे स्वागत केले. त्याला अशा प्रकारे स्वागत करतांना पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने ‘‘तुम्हाला कुठे जायचे आहे’’, असे नम्रतेने विचारल्यावर ‘‘मला इमारतीच्या सर्वांत वरच्या माळ्यावर जायचे आहे’’, असे मी त्याला सांगितले. आतापर्यंत वाहनतळात गाडी ठेवण्याच्या सर्व जागा भरल्या होत्या. त्याही स्थितीत त्याने मला गाडी ठेवण्यासाठी एक जागा दाखवली; परंतु ती जागा एवढी अडचणीची होती की, तेथे गाडी ठेवल्यास माझ्या गाडीच्या मागे इतरांनी गाडी ठेवली, तर नंतर तेथून मला गाडी काढणे अवघड झाले असते. मी घाईत असल्यामुळे गाडी तेथेच ठेवली. सुरक्षारक्षकाने माझ्याकडे गाडीची किल्ली मागितली; परंतु ‘त्याला किल्ली द्यावी कि न द्यावी’, या संभ्रमित अवस्थेत मी तसाच उभा होतो. बहुधा त्याला ते समजले असावे. माझ्याकडे पाहून तो हसला. तो म्हणाला, ‘‘ठीक आहे, तुम्ही तुमचे काम करून या.’’ त्याने मला तसेच जाऊ दिले.

३. वाहनतळातून गाडी बाहेर काढतांना अडचण आल्यावर सुरक्षारक्षकाने नेहमी बंद असणारे मागच्या बाजूचे फाटक उघडून गाडी बाहेर काढण्यास साहाय्य करणे

अधिकोषातील काम संपवून खाली यायला आम्हाला ४५ मिनिटे लागली. तोपर्यंत आमच्या गाडीसमोर २ गाड्या लावल्या होत्या. त्यामुळे मला गाडी बाहेर काढता येत नव्हती. मी ‘काय करायचे ?’, असा विचार करत असतांनाच तो सुरक्षारक्षक आला आणि नम्रतेने म्हणाला, ‘‘साहेब, तुम्हाला गाडी काढायची आहे का ? चिंता करू नका. त्याने माझ्या गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या फाटकाचे टाळे (कुलूप) काढून फाटक उघडले. एरव्ही हे फाटक बंदच असते. त्याने मला गाडी मागे घ्यायला साहाय्य केल्यामुळे मी गाडी सहजतेने बाहेर काढू शकलो.

४. ‘सेवेसाठी प्रयत्न म्हणून आपण ५ पावले चालल्यास गुरुदेव आपल्या साहाय्यासाठी येतात’, याची प्रचीती येणे

नंतर ‘त्या सुरक्षारक्षकाला चहापाण्यासाठी पैसे देऊया’, असा विचार करून मी पुन्हा आत गेलो. आम्ही फाटकातून बाहेर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मी तेथे गेलो होतो; तरीही तो सुरक्षारक्षक मला दिसला नाही. मी इमारतीच्या आवारात त्याला शोधले. मी तेथील लोकांकडेही त्याची चौकशी केली. तेव्हा त्यांनी ‘असा कुणी सुरक्षारक्षक तेथे नाही’, असे सांगितले. तेव्हा माझ्या मनात ‘तो कोण असेल ? मला त्याला का ओळखता आले नाही ?’, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आले. या प्रसंगाचे चिंतन केल्यावर ‘देवच सुरक्षारक्षकाच्या माध्यमातून मला साहाय्य करत आहे’, असे मला वाटले.

यापूर्वी ‘समष्टी सेवा करणे, म्हणजे १०० पावले चालणे (प्रत्येक पाऊल म्हणजे १ अडथळा)’, असे मला वाटत होते; परंतु या प्रसंगानंतर ‘आपण ५ पावले चाललो, तर गुरुदेव ९५ पावले आपल्या समवेत चालून आपल्या साहाय्यासाठी येतात’, याची मला प्रचीती आली. ‘ते आपला हात धरून आपल्याकडून अचूक सेवा करून घेतात’, याची मला जाणीव झाली.

५. कृतज्ञता

आतापर्यंत केवळ देवाच्या कृपेमुळेच माझी समष्टी सेवा होत आहे. अनेकदा ‘एक शक्ती मला यासाठी प्रेरणा देत आहे’, असे मला जाणवते. नोकरीच्या ठिकाणी कराव्या लागणार्‍या विविधांगी कामांमुळे मला समष्टी सेवेसाठी वेळ देता येत नाही; परंतु अलीकडे माझ्याकडून ‘कार्यालयीन कामे आणि समष्टी सेवा’ या दोन्हींचा उत्कृष्ट मेळ साधला जात आहे. ‘गुरुदेवांच्या कृपेने माझ्यातील कर्तेपणा न्यून होत आहे’, हे लक्षात येते. या विलक्षण अनुभूतीबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. बालाजी कोल्ला, चेन्नई (२८.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक